म. जोतीराव फुले यांचे स्मरण करतांना ....
म. जोतीराव फुले यांचे स्मरण करतांना .....
डॉ. राजेंद्र
गोणारकर
९८९०६१९२७४
तमाम बहुजनांचे कृतिशील कैवारी असणार्या म . जोतीराव फुले यांच्या निधनास २८ नोव्हेंबर २०१५ रोजी १२५ पूर्ण होतील. त्यांच्या शतकोत्तर रौप्य स्मृतिवर्षास आजपासून (२८ नोव्हेंबर २०१४) प्रारंभ होत आहे. त्या निमित्त हा लेख.________________________________________________________
भारतातील तमाम बहुजनांच्या शिक्षणाचे ज्ञानपीठ म्हणजे म. जोतीराव फुले होते. म . जोतीराव फुले यांनी धर्म , संस्कृती आणि इतिहास यांचे
टीकात्मक आकलन केले . चार्तूवर्ण्ये, अस्पृश्यता,
जन्मजात वर्चस्व, स्त्री पुरुष भेदाभेद आणि
गुलामगिरी अशा जीवन रचनेच्या विरुद्ध आयुष्यभर प्रखर लढा उभारला.
आपल्या अखेरच्या कालखंडात म. जोतीराव फुले
' सार्वजनिक सत्यधर्म " नावाचा ग्रंथ लिहित
होते. हे काम चालू असताना त्यांना अर्धांगवायूचा झटका आला.
त्यांचा उजवा हात, उजवा पाय लुळा झाला.
पण हाती घेतलेले काम त्यांनी सोडले नाही. डाव्या
हाताने लिहून
त्यांनी त्या ग्रंथाचे लेखन
पूर्ण केले . या ग्रंथाचे पहिले वाक्य
असे आहे
,"मानवप्राणी एकंदर सर्व जगात कशानं सुखी होईल ?" आपल्या अंतिम समयी देखील जगातील मानवाच्या सुखाचा विचार म जोतीराव फुले करीत
होते. २८ नोव्हेंबर १८९० रोजी त्याचं निर्वाण झालं. २८ नोव्हेंबर २०१५ रोजी त्यांच्या
निधनास १२५ पूर्ण होतील. त्यांच्या
शतकोत्तर रौप्य स्मृतिवर्षास आजपासून (२८ नोव्हेंबर २०१४) प्रारंभ होत आहे. आज इतक्या वर्षांनंतर देखील त्यांचे विचार सामाजिक
वाटचालीत मार्गदर्शक ठरत आहेत . जोतीराव फुले आज नाहीत पण त्यांनी दलित , शोषित पिडीत
कामकरी शेतकरी कष्टकरी गोरगरीब या सर्वसामान्य माणसांना आधार दिला. दिलासा दिला. चळवळ दिली, विचार
दिला , ध्यास दिला, प्राण दिला आणि त्या
माणसाला जीवन दिले. त्या माणसांच्या देहामध्ये माणूसपण
ओतले. त्या म. जोतीराव
फुल्यांचे स्मरण
सदैव प्रेरणादायी असेच आहे. सामान्य माणसाविषयी अपार तळमळ जे
जोतीराव फुल्यांच्या विचारांचे मुख्य
सूत्र होते . जोतीराव फुल्यांचा विचार सर्वमानवव्यापी
होता. मानवजातीतील सर्व वास्तव विचार आणि सर्वांना समान न्याय
हा त्यांचा सत्यधर्म होता. गुलामगिरी, सार्वजनिक
सत्यधर्म , इशारा , छत्रपती शिवाजीराजे
भोसले यांचा पोवाडा, सत्यशोधक समाजोक्त पूजाविधी , ब्राह्मणाचे कसब, शेतकर्याचा आसूड
, सत्सार , हंटर शिक्षण आयोगासमोर सादर केलेले
निवेदन, अखंडादी काव्यरचना इत्यादी ग्रंथांची निर्मिती करून भारतातील
परंपरागत समाज संस्थाच्या विरुद्ध बंड पुकारणारे जोतीराव फुले हे पहिले भारतीय होते.
आयुष्यभर
जोतीराव फुले सनातन व्यवस्थेशी संघर्ष करीत राहिले. त्यांचे भांडण कुठल्या जातीशी किंवा व्यक्तीशी नव्हते . त्यांचा लढा मानवतेच्या विरुद्ध असणाऱ्या प्रवृत्तीशी होता. मानवी कल्याण हे त्यांच्या समग्र विचार आणि कार्याचे मध्यवर्ती सूत्र होते. म.
जोतीराव फुल्यांनी स्त्रिया, शेतकरी आणि दलित यांच्यासाठी
केवळ कार्य केले असे नाही तर त्यांना आपल्या न्याय्य हक्काची जाणीव करून
दिली. त्यांना ज्ञानाच बळ
दिले . लढण्यासाठी धैर्य दिले . आज स्त्रियांची चळवळ, शेतकऱ्यांची चळवळ आणि दलित चळवळ खूप विस्तारली आहे , याचे श्रेय
निश्चितच म. फुल्यांना द्यावे लागेल.
म . जोतीराव फुल्यांनी शेतीच्या प्रश्नाचा
मूलगामी अभ्यास केला होता. आपल्या बोचऱ्या , रोखठोक , अगदी हुबेहूब चित्र उभे राहावे अशा भाषेत शेतकऱ्यांचे दैन्य , दारिद्र्य आणि सावकारी - अधिकारी यांच्याकडून
होणारी छळवणूक त्यांनी "शेतकऱ्याचा आसूड " मध्ये अतिशय ताकदीने मांडली. शेतकऱ्याला "बळीराजा " शी एकरूप मानून नव्या ग्रामरचनेचे प्रारूप तयार केले. शेतकऱ्याच्या जीवनाचा
विकास शेती सुधारल्याशिवाय होणार नाही हे म. जोतीराव फुल्यांनी ओळखले होते. शेती सुधारण्यासाठी त्यांनी शेतीसंबधीचे अत्याधुनिक ज्ञान शेतकऱ्यांना
मिळाले पाहिजे , त्याच्याशी
संबधित ग्रंथ त्यांना उपलब्ध झाले पाहिजेत, उत्तम बैल त्यांना
मिळाले पाहिजेत , जनावरांसाठी जंगले मोकळी राहिली पाहिजेत, वाहणाऱ्या पाण्याला अडवून पोलिस आणि सैन्यामार्फत बंधारे घातले
पाहिजेत, ठिकठिकाणी असणाऱ्या पाण्याचा शोध घेतला पाहिजे, पिकाचे संरक्षण होण्यासाठी पिकांवर पहारे बसविले पाहिजेत इत्यादी अनेकविध उपाय शेती
सुधारण्यासाठी म. फुल्यांनी सुचविले.
आज
महाराष्ट्रात शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान आले आहे, हरित क्रांतीने शेतीला नवा आयाम प्रदान केला, शेती संशोधनसाठी कृषि विद्यापीठे स्थापन झाली. शेतीच्या
उत्पादनात वाढ देखील झाली आहे. तथापि प्रत्यक्ष शेतीत राबणारा शेतकरी
आज हवालदिल झाला आहे. सावकारी पाश इतके आवळल्या गेले आहेत की जगाचा पोशिंदा म्हणून ज्याचा गौरव केला
जातो त्याच्यावरच आत्महत्येची पाळी आली
आहे. खुल्या आर्थिक धोरणामुळे शेती हा व्यवसाय बनेल, शेतीला नि शेतकर्यांना चांगले दिवस येतील, ही आशा निष्फळ ठरत आहे .शेतकर्यांच्या मुलांना शिक्षण द्यावे, सरकारने त्यासाठी खास प्रयत्न करावेत, शेतकर्यांच्या
मुलांच्यासाठी वसतिगृहे काढावीत, त्यांना व्यावसायिक शिक्षण
द्यावे, असे जोतीराव फुल्यांचे आग्रही सांगणे होते.
शिक्षणाची जबाबदारी घ्यायला आज सरकार तयार नाही.
व्यावसायिक शिक्षणाची फिस एवढी भरमसाठ आहे की गरीब पालक इच्छा असून ही आपल्या
पाल्यास ते शिक्षण देऊ शकत नाहीत. सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी फुल्यांनी संघर्ष
केला. आज शिक्षण सर्वांना खुले आहे पण आर्थिकतेच्या आडून गरिबांसाठी शिक्षणावर
अघोषित बंदीच लादली आहे. बळीचे राज्य यावे
ही कामना करून ही वामनाचे राज्यच वाटयास यावे
याला काय म्हणावे ?
अज्ञान, अस्पृश्यता, दारिद्र्य यांच्या गर्तेत रूतलेल्या दलित समूहाला म. फुल्यांनी आपल्या
हृदयाशी धरले. पुण्यातील धर्म मार्तंडाची पर्वा न करता त्यांनी आपल्या वाड्यातील
विहीर त्यांच्यासाठी खुली केली. दलितांच्या मुला-मुलींसाठी शाळा काढल्या. राजकीय
आणि आर्थिक गुलामगिरीपेक्षाही मानसिक गुलामगिरी अधिक भीषण असते याची फुल्यांना
पुरेपूर जाणीव होती. मानसिक गुलाम माणूस हाता-पायांतील
बेड्यांनाच अलंकार मानू लागतो. त्यामुळे त्याची गुलामगिरी दीर्घकाल टिकून राहते. धर्म, संकृती , परंपरा यातून ती अधिक घट्ट होते, हे ओळखून म. फुल्यांनी माणूसपण नाकारणार्या धर्म परंपरेची कठोर चिकित्सा
केली. सर्वांचे माणूसपण जागे व्हावे यासाठी प्रयत्न केले. संपूर्ण क्रांती हा शब्द आज खूपच रूढ आहे . परंतु मानवी मनात सांस्कृतिक पातळीवर मूल्यव्यवस्था बदलल्याशिवाय कोणताही माणूस
क्रांतीसाठी सज्ज कसा होणार ? जोतीराव फुल्यांनी माणसाला उभे केले. माणसाच्या बुद्धीविकासातील
अडसर दूर केले.
" झाडाच्या प्रत्येक पानाला सूर्यकिरणांचा लाभ मिळतो तर
मानवी समाजात अशी दयनीय अवस्था
का ? काही
उपाशी , काही तुपाशी ! काही उन्हात काही
सावलीत ! आणि याला जन्माचा आधार का असावा ? ” माणसाचं मोल जन्मावरून नाही तर त्याच्या कर्मावरून ठरवावे, या विचारांचा त्यांनी आग्रह धरला.
२६ जानेवारी १९५० रोजी देशात संविधान लागू झाले. राजकीय समता आस्तित्वात आली पण आर्थिक आणि
सामाजिक समतेचे काय ? हा प्रश्न
आज ही गंभीर आहे . खैरलांजी, सोनाई ,
खेर्डा नि जवखेडा खालसा हत्याकांड काय दर्शवितात ? परत जात
आणि धर्माच्या अहंकारात दलितांचे शिरकाण केल्या जात आहे. दलितांना दहशतीत ठेवण्याचे षडयंत्र रचल्या जात
आहे. त्यांनी हक्क्च मागू नये, दिले ते घ्यावे ही वर्चस्ववादी
भूमिका राजरोसपणे घेतली जात आहे. बहिष्कारचे सत्र चालूच आहे. अशा वेळी म.
फुल्यांची आठवण प्रकर्षाने होते.
जोतीराव फुल्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा काढली.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांनी सनातन्यांनी वापरलेले अपशब्द पचविले. दगड-गोटयांचा
व शेणाचा मारा सहन केला. पण स्त्री शिक्षणाचे व्रत सोडले नाही. ज्यांनी त्या वेळी
स्त्री शिक्षणास विरोध केला त्यांच्या मुली आज शिक्षण घेऊन उच्च पदाला पोहचल्या. मुली
कोणत्याही का असेना त्या शिकल्या ही खूपच चांगली बाब आहे. पण ज्या स्त्रीने मुली
शिकाव्यात स्वावलंबी व्हाव्यात, असे स्वप्न पाहिले. आज इतक्या वर्षांनंतरही ग्रामीण, कष्टकरी, दलित व आदिवासी मुलींचे शिक्षणाचे प्रमाण अजूनही
फारसे समाधानकारक नाही. आपण माध्यमक्रांती, जागतिकीकरणाच्या
युगात वावरत आहोत, पण स्त्रियांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोण
अद्यापही पारंपरिकच राहिला आहे. स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. ही
चिंतेची बाब आहे.
म . जोतीराव फुल्यांच्या शतकोत्तर रौप्य स्मृती वर्षात या
प्रश्नांचा पुन्हा गंभीरतापूर्वक विचार व्हावा. नांदेडला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , म. गांधी, महाराणा प्रताप, अण्णा भाऊ साठे या महामानवांचे पूर्णाकृती पुतळे आहेत. त्यांचे नव्याने
सुशोभिकरण देखील झाले आहे. पण जोतीराव फुले यांचा अर्धाकृती पुतळा आणि तोही
सुशोभिकरणाच्या प्रतीक्षेत, या उपेक्षेला काय म्हणावे ? या वर्षात तरी ही उपेक्षा संपावी ही अपेक्षा करायला काय हरकत आहे ? म. फुल्यांनी ज्या प्रश्नांसाठी संघर्ष केला ते प्रश्न वेगळ्या स्वरुपात
आजही सतावत आहेत. याचा सविस्तर अभ्यास व्हावा, फुल्यांच्या
विचार व कार्याचे नव्या संदर्भात संशोधन व्हावे यासाठी स्वामी रामानंद तीर्थ
विद्यापीठात म. जोतीराव फुल्यांच्या नावाने अध्यासन या वर्षात सुरू व्हावे, असे ही सुचवावेसे वाटते.
म. जोतीराव फुल्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम !!!
-------------------------------------------------------------------------
डॉ. राजेंद्र गोणारकर
९८९०६१९२७४
याला काय म्हणावे ?
म . जोतीराव फुल्यांच्या शतकोत्तर रौप्य स्मृती वर्षात या
प्रश्नांचा पुन्हा गंभीरतापूर्वक विचार व्हावा. नांदेडला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , म. गांधी, महाराणा प्रताप, अण्णा भाऊ साठे या महामानवांचे पूर्णाकृती पुतळे आहेत. त्यांचे नव्याने
सुशोभिकरण देखील झाले आहे. पण जोतीराव फुले यांचा अर्धाकृती पुतळा आणि तोही
सुशोभिकरणाच्या प्रतीक्षेत, या उपेक्षेला काय म्हणावे ? या वर्षात तरी ही उपेक्षा संपावी ही अपेक्षा करायला काय हरकत आहे ? म. फुल्यांनी ज्या प्रश्नांसाठी संघर्ष केला ते प्रश्न वेगळ्या स्वरुपात
आजही सतावत आहेत. याचा सविस्तर अभ्यास व्हावा, फुल्यांच्या
विचार व कार्याचे नव्या संदर्भात संशोधन व्हावे यासाठी स्वामी रामानंद तीर्थ
विद्यापीठात म. जोतीराव फुल्यांच्या नावाने अध्यासन या वर्षात सुरू व्हावे, असे ही सुचवावेसे वाटते.
डॉ. राजेंद्र गोणारकर
Comments
Post a Comment