भाऊसाहेब मोरे : रानफुल
ज्वालांचं
मराठवाडी रानाचं आभाळ मुक्त नव्हतं कधीच
नव्हतं उगवलं इवलं फूल इथल्या माळावर कधीच
भाऊसाहेब तुम्ही रानफुल ज्वालांचं
जाळणारं नि स्वतः जळणारं
मक्रणपूरला करून बीजभूमी
मराठवाड्याच्या मातीला तुम्ही दिला
बाबासाहेबांच्या विचारांचा सूर्यस्पर्श
तेव्हा पासून कुठं राहिलो आम्ही अस्पृश्य ?
ते युद्ध होतं झेप नाकारणार्या आभाळाशी
ती लढाई होती अंकुर नाकारणार्या भुईशी
तो लढा होता श्वास नाकारणार्या जीवनाशी
मक्रणपूरनं दिलं माणूस होण्याचं स्वप्न
मराठवाडी माणसांना
भाऊसाहेब, तुम्ही दिली आभाळहाक
बोलो भीम ! बोलो भीम !!
माणसांचा समुद्र गरजला
जयभीम... जयभीम !!!
निनाद घुमतोच आहे निळ्या नभात तेव्हा पासून
तुम्ही दिला नाही फक्त जयभीमचा नारा
तुम्ही वाजविला बिगुल क्रांतीचा खास
दिला हिरव्या पृथ्वीला माणूसपणाचा नवा श्वास
तुम्ही दिला मुक्तीचा शब्द मुक्या ओठांना
तुम्ही दिलं बळ सूर्यफुलांच्या देठांना
बाबासाहेबांचा शब्द मानून प्रमाण
निजामाचा निजाम उतरविण्याच्या संघर्षात तुम्ही दिलं
झोकून स्वतःला
पेटलात तुम्ही अन पेटवलं माणसांना
मक्रणपूर परिषदेनं केलं पोलाद मेणाच्या मनाला
औरंगाबादेत उभं केलं बाबासाहेबांनी नागसेन वनाला
अक्षरं पेरली की उगवतं ज्ञान ह्या कळत्या क्षणाला
अक्षरांच्या मळ्यात आणले तुम्ही अनेक लेक
चळवळीसाठी दिले तुम्ही अनेक नेक
आज चळवळ थोडी थकली आहे
जराशी चुकली आहे
नेकीला मुकली आहे
उजवीकडे झुकली आहे
मक्रणपूरला आठवतांना
काळ पुन्हा देतो आहे पुकारा
पेटा ना ... पेटवा ना विझण्याआधी निखारा !
-राजेंद्र गोणारकर
माध्यमशास्त्र संकुल
स्वामी रामानंद तीर्थ
मराठवाडा विद्यापीठ , नांदेड
मो. 9890619274
Comments
Post a Comment