धर्मांतराचे वैश्विक संदर्भ
¨डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराचे वैश्विक संदर्भ
-डॉ.
राजेंद्र गोणारकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
विचार आणि कृतीचे आकलन करतांना त्याचे
भारतीय संदर्भ जसे पहावे लागतात तद्वतच त्याचे वैश्विक संदर्भ देखील समजून
घ्यावे लागतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले धर्मांतर ही भारतीय पातळीवर
अभूतपूर्व अशी घटना होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत
केलेले हे धर्मांतर भारतातील विषमतेला जन्म देणार्या चातुर्वर्ण्यव्यवस्थेला दिलेले सडेतोड उत्तर
होते. या धर्मांतराने पशूपेक्षा हीन मानल्या गेलेल्या अस्पृश्य समाजाला
स्वाभिमानाचे जिणे दिले. व्यवस्थेने हजारो वर्ष त्याच्यापासून हिरावून घेतलेले त्याचे
माणूसपण त्याला दिले. अल्पावधीत धर्मांतरीत बौद्धांनी
केलेली प्रगती खचितच विस्मय वाटावा अशी आहे, म्हणूनच या
धर्मांतराला खूप मोल आहे.
धर्मांतर करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका स्फटिकासारखी स्पष्ट
होती. व्यवस्थेत राहून व्यवस्थेच्या बदलाची अभिलाषा बाळगता येत नाही. पायाच चुकीचा
असेल तर डोलार्याच्या डागडुजीने काम भागणार नाही. पायासह डोलारा पाडल्याशिवाय नवी
व्यवस्था उभी करणे शक्य नाही . रूढी, परंपरा व जी जुनी मूल्यव्यवस्था मनुष्यमात्राच्या
विकासाला बाधक आहे ती नाकारून नव्या समाजाच्या
उभारणीसाठी नवी मूल्य, नवी संस्कृती व नवी
संरचना असणार्या बौद्ध धम्माचा पर्याय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला. एक
गोष्ट अगदी स्पष्टपणाने समजून घ्यायला हवी. केवळ अस्पृश्यांसाठी नवा जीवन मार्ग
म्हणून ते बौद्ध धम्माकडे पाहत नव्हते तर संपूर्ण भारतीय समाजासाठी बौद्ध धम्म
एक पर्याय म्हणून ते देऊ इच्छित होते.
जुन्या नि
दुबळ्या भारताला नव्या समर्थ भारतात रूपांतरित करण्याचे ते दृष्टे अभियान होते. बौद्ध
धम्म केवळ अस्पृश्यांच्या मुक्तीसाठी नाही तर सबंध भारतीय समाजाच्या आधुनिकीकरणासाठी, नव्या उन्नत मानवी समाजाकडे गतिमान वाटचाल करण्यासाठीचा मार्ग म्हणून ते
बौद्ध धम्माकडे पाहत होते. धर्मांतराची ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची व्यापक धारणा
व भूमिका समजून घ्यायला हवी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेचा
पुरस्कार करणार्या हिंदू धर्माला नाकारून ज्या बौद्ध धम्माचा त्यांनी स्वीकार केला, तो धम्म स्वीकारतांना जगभर
पसरलेल्या पण सरंजामी, लष्करी, भांडवली
राजसत्तेची पाठराखण करणार्या भिक्खूसंघ व त्यांच्या पारंपरिक बौद्ध धर्मालाही त्यांनी तितक्याच निग्रहाने
नाकारले. काळाच्या ओघात निर्माण झालेले हीनकस टाळून नव्या जगाशी अधिक सुसंवादी
असणार्या बुद्ध विचारांचे मूलभूत सत्त्व
त्यांनी स्वीकारले. त्यामुळे तत्कालीन अनेक बौद्ध विद्वान नाराज झाले. पण डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांनी कसलीही तडजोड केली नाही. त्यांनी नवा बुद्ध जगाला दिला. डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध जगाची पूनर्रचना करण्याची क्रांतिकारक घोषणा करतो. तो इतिहासकडे
जात नाही तो वर्तमानाची कठोरतम चिकित्सा करून भविष्याचा शास्त्रीय
वेध घेतो. हिंदू धर्म नाकारणे ही डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांची भारतीय
संदर्भात क्रांती होती तशी बौद्ध धम्माचा स्वीकार करतांना जगात विद्यमान पारंपरिक बौद्ध
धर्मालाही नाकारणे ही त्यांची तितकीच महत्त्वपूर्ण वैश्विक बंडखोरी होती.
बुद्ध विचारांच्या उदयाला भारतीय संदर्भ जरूर होते. पण केवळ वैदिक
संस्कृतीला बुद्धाने पर्याय दिला असे नाही तर अशी कुठलीही व्यवस्था, जिथे कुठे माणूस
दडपला गेला आहे. जिथे कुठे शोषण आहे. जिथे कुठे अन्याय आहे. जिथे कुठे दु:ख
आहे. त्या व्यवस्थेला बुद्धाने समतेचा, स्वातंत्र्याचा व बंधुतेचा पर्याय दिला. म्हणून देशाच्या सीमा ओलांडून बुद्ध विचार जगात गेला. जगातील लोकांनी बुद्धाला आपलेसे केले. अंधाराला
कवटाळणार्या जगाला बुद्धाने प्रकाशाकडे नेले नाही तर स्वतः प्रकाशमान होण्याचा
मार्ग सांगितला. बुद्धाने ईश्वराशी नाही तर माणसाशी संवाद साधला. समाजाला नाही तर
माणसाला आपल्या चिंतनाचा केंद्र मानले. त्यांच्या दु:ख मुक्तीचा विचार मांडला.
चातुर्वर्ण्यव्यवस्थेचा
निरास करताना बुद्धाने दास मुक्तीची क्रांती केली. बुद्धाची क्रांती जीवनाच्या
सर्व अंगांना व्यापून होती. आधुनिक काळातही जग बदलण्यासाठी बुद्ध तत्वज्ञान
हवे हे बाबासाहेबांना
नीटपणे कळले होते, त्यामुळे धर्मांतर करून भारतात लुप्त
झालेल्या बौद्ध धम्माचे धम्मचक्र त्यांनी गतिमान केले. हे करतांना भारताबाहेरील
बौद्ध देशातही पुन्हा धम्मचक्र प्रवर्तन व्हावे यासाठी त्यांचे मन तितकेच आतुरले
होते. भिक्खू संघाच्या संकरीत धर्मा ऐवजी बुद्धाचा खराखुरा धम्म प्रस्थापित व्हावा, ही त्यांची तळमळ
होती. बाबासाहेब भारत नव्हे तर जग बौद्धमय करू इच्छित होते. बाबासाहेब जगाला नवा
बुद्ध देऊ पाहत होते हे समजून न घेता इथे तर बाबासाहेबांनी दिलेला विज्ञानवादी, कालसुसंगत बुद्ध
सोडून जगात पसलेला परंपरागत बुद्ध स्वीकारण्याची घाई चालली आहे, याला काय
म्हणावे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराचे भारतीय व वैश्विक
संदर्भ समजून घेतांना धर्मांतराच्या इतक्या वर्षांनंतर तरी बाबासाहेबांच्या
वैश्विक विचारांकडे आपण जाणार आहोत की नाही
हा खरा प्रश्न आहे. दक्षिण आफ्रिका , दक्षिण अमेरिका, लॅटिन अमेरिका, दक्षिण आशियाई देश, युरोप,
आखाती देश या सर्वच ठिकाणी काळे, कष्टकरी, दडपले गेलेले लोक न्यायासाठी टाहो फोडत आहेत. यांच्याशी आपले नाते आहे की
नाही ? यांच्यावर होणार्या आर्थिक, सामाजिक
दडपणूक व वांशिक विषमतेविरुद्ध भारतातील बौद्ध भूमिका घेणार आहेत की नाही ? बुद्धीझमची प्रस्थापना म्हणजे समता आणि शांततेची प्रस्थापना असेल तर जग
विषमताग्रस्त व अशांत ठेऊन केवळ भारतात समता आणि शांतता आणता येईल का ? याचा डोळे मिटून नव्हे तर डोळे उघडे ठेऊन विचार करावा लागेल. मानवमात्राच्या
विकासाला वाव देणारे नवे जग निर्माण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार व
बुद्ध विचार यांना वाट पुसत वाटचाल करावी लागेल. दुनियेतील
तमाम शोषित, कष्टकरी, दलित, पददलित, समस्त स्त्रिया यांच्यासाठी बुद्धाचा विचार
हीच दूधाची, फळांची व मधाची भूमी आहे,
हे समजून घ्यायला उशीर करता कामा नये.
-
डॉ. राजेंद्र गोणारकर
माध्यमशास्त्र संकुल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
नांदेड 431606 मो. 9890619274
Comments
Post a Comment