buddha

बुद्धाचा प्रतित्यसमुत्पाद : प्रज्ञेची भूमी


डॉ. राजेंद्र गोणारकर


“बुद्धाचा प्रतित्यसमुत्पाद” हे मधुकर पाईकराव लिखित पुस्तक बुद्ध विचारांचे केलेले सुबोध आणि रसाळ विवेचन आहे. देकार्त म्हणाला होता मी विचार करतो म्हणून मी आहे (I think therefore I am ) पण बुद्धाने केवळ विचार करायला शिकविले नाही तर मानवी कल्याणाचा विचार करायला शिकविले. बुद्ध जे काही बोलले ते अत्यंत तर्कशुद्ध होते. पण ते कोरडे मुळीच नव्हते. करुणेचा असीम ओलावा त्यात ओतप्रोत भरलेला होता. बुद्धाने विषमता हाच लंकार मानणार्‍या वैदिक संस्कृतीला नकार दिला हे खरेच आहे. बुद्धाने जगातील सर्व तर्‍हेच्या विषमतेला निर्णायक विरोध केला.जगात जिथे कुठे विषमता आहे, जिथे कुठे स्त्रियांना दुय्यम वागणूक आहे, जगात जिथे कुठे शोषण आहे, पिळवणूक, दमन आहे. त्या सर्व व्यवस्थेला पर्याय म्हणून बुद्धाने स्वातंत्र्य,समता,आणि बंधुतेचा उदघोष केला. हा नवा विचार होता. सर्व मानवांना उन्नत करणारा हा विचार होता. म्हणून जगभर बुद्ध विचारांना नुयायी मिळाले. बुद्ध विचार देणारा भारत देश जगासाठी आदरणीय भूमी बनला. पण असे असून ही भारतातून बुद्ध विचार धूसर झाला. धूसर केला गेला. मानवी कल्याणचा विचार अत्यंत निर्ममपणे दडपून टाकण्यात आला. हा देश परत विषमतेची अंकारमय गुहा बनला. हा देश विकासाला पारखा झाला. हा देश परकीयांचा वेळोवेळी गुलाम झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली बुद्धाचे धम्मचक्र पुन्हा एकदा गतिमान केले.
बुद्ध विचारांतून आलेल्या लोकशाहीचा आपण स्वीकार केला आहे. त्यामुळे बुद्ध विचार जितका समाजात रूजेल. तितकी आपली लोकशाही बळकट होईल. हे समजून घेणे आज आवश्यक बनले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले एक दोन निबंध, काठमांडूच्या धम्मपरिषदेतील ऐतिहासिक भाषण आणि त्यांचा जगप्रसिद्ध ग्रंथ “बुद्ध अँड हिज धम्म” एवढीच उणीपुरी सामग्री ते आपल्या महापरिनिर्वाणापूर्वी आपल्यासाठी ठेवून गेले. पण जाण्यापूर्वी त्यांनी एक प्रतिज्ञा केली भारत बौद्धमय करण्याची. मला असे वाटते ती आम्हा सर्वांचीच प्रतिज्ञा आहे. त्यामुळे बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसार करणे. अधिक गतीने करणे हे बुद्धिजीवी वर्गाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी मधुकर पाईकराव यांनी जाणली आहे.
बुद्धाचा विचार हा जगभर पोहचला. वेगवेगळया काळात काळ प्रदेश संस्कृती नुसार बुद्ध विचार समजून घेण्यात आला. त्याचा अर्थ अन्वयार्थ लावण्यात आला. काहींना समाधी हे  बुद्ध धम्माचा महत्त्वाचे अंग वाटले .काहींना बुद्धांची विपश्यना खूप मोलाची वाटली. काहींना बुद्धधम्म गुप्त मंत्रासारखा वाटला. काहींच्या मते बुद्ध विचार ही रुक्ष विचारप्रणाली आहे.  बुद्ध धम्माचा स्वीकार करतांना बाबासाहेबांना  बुद्ध धम्माची ही वैशिष्ट्ये आकर्षित करीत नव्हती. बुद्धाने यापेक्षा वेगळे काही सांगितले का ? याचा ते शोध घेत होते. त्यांनी या संबंधी काही मौलिक प्रश्न उपस्थित केले. बुद्धाने प्रेम, न्याय,स्वातंत्र्य,समता,बंधुता शिकविली काय ? बुद्ध कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकतो काय ? हे प्रश्न केवळ त्यांनी उपस्थित केले नाही तर बुद्धाने या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत असा दावा ही त्यांनी केला. बुद्धाने जो सामाजिक संदेश दिला तो बाबासाहेबांना जास्त भावला. पण बुद्धाच्या या सामाजिक संदेशाकडे जगाने साफ दुर्लक्ष केले याबद्दल बाबासाहेब खंत व्यक्त करतात. बुद्धाला जगात  दु:ख दिसले पण या दु:खी  जगापासून त्यांनी पलायन केले नाही तर ह्या जगाची पुनर्मांडणी करण्याचा मार्ग सांगितला. जगाची पुनर्रचना करणे हाच बुद्धाचा सामाजिक संदेश होता. याकडे पुनःपुन्हा लक्ष देण्याची जरुरी वाटते.
बुद्धाचा जयजयकार करणे सोपे आहे. पण बुद्ध समजून घेतला पाहिजे आणि केवळ समजून घेतला पाहिजे असे नाही. तर मधुकर पाईकराव यांनी नोंदविल्या प्रमाणे , “जे काही ज्ञान प्राप्त झाले ते लोकांना सांगत जाणे,त्यांच्या जीवनातील तिमिर घालवणे. ज्ञान पेरल्यावर कमी होत नाही, वाढत जाते. गुढता ज्ञानाचे डबके बनविते. हे डबके सीमाबद्ध असते. त्यात आवक जावक होत नाही. झालीच तर काही मूठभरांची. यामुळे पौरोहित्य अबाधित राहतात आणि सामान्य जनता भरडली जाते. म्हणूनच ज्ञान हे सर्वांसाठी खुले ठेवावे लागते.” मधुकर पाईकराव यांनी याच भूमिकेतून या पुस्तकाचे लेखन केले आहे. समजून घेतलेले समजून सांगणे याच धारणेतून त्यांचे  “निब्बान” हे  पुस्तक  यापूर्वीच प्रकाशित झाले आहे, अभ्यासू वाचकांनी त्या पुस्तकाची  दखल घेतली आहे, हे विशेषत्वाने सांगितले पाहिजे. बुद्धाचा प्रतित्यसमुत्पाद हे पुस्तक देखील पाईकराव यांच्या अभ्यासूपणाची साक्ष देते.
बुद्धाचा प्रतित्यसमुत्पाद हा अत्यंत महत्वाचा विचार आहे. बुद्धाने जगातील दु:खाचे  कारण शोधून काढणाऱ्या परंपरेचे विवेचन  केले  ती दु:ख  कारण परंपरा म्हणजे प्रतित्यसमुत्पाद होय. ही दु:खे परस्परांशी कशी जोडलेली आहेत, ती परस्परांवर कशी अवलंबून आहेत. हे बुद्धाने प्रतित्यसमुत्पादाच्या पूर्वार्धात (अनुलोम भागात )सांगितले. या दु:खाचा निरोध कसा करायचा, ते नष्ट कसे करायचे ते बुद्धाने उत्तरार्धात अर्थात प्रतिलोम भागात स्पष्ट केले आहे. हे दु:ख कसे टाळता येईल याचे विश्लेषण त्यांनी प्रतिलोम समुत्पादात केले आहे. याची खूप सूत्रबद्ध मांडणी पाईकराव करतात. बुद्ध हे खरे वैज्ञानिक, आहेत असे सांगून ते म्हणतात की “ बुद्धाचा धम्म हा देवाचा नाही आणि देवासाठीही नाही. तो माणसासाठी आहे. माणूस विकसनशील आहे तर त्याचा धर्म अपरिवर्तनीय कसा असू शकेल ? गतीवाद हाच धम्म आहे ” दैववादाची परंपरा लाभलेल्या समाजाला बुद्ध विज्ञानाकडे कसे घेऊन जातात याचे सोदाहरण स्पष्टीकरण लेखकाने मनस्वीपणे केले आहे. त्यात त्यांची तळमळ देखिल जाणवत राहते.  शील, नैष्कर्म्य, दान, वीर्य, क्षांती, सत्य, अधिष्ठान, करुणा, मैत्री व उपेक्षा या  बुद्धाच्या शील मार्गाची मधुकर पाईकराव यांनी  उत्तरार्धात केलेली मीमांसा वेधक आहे.
मधुकर पाईकराव यांची दृष्टी चिंतकाची आहे. ती दृष्टी निकोप आहे.  सकारात्मकता त्यांच्या लेखणीचा गुण असला तरी खटकणाऱ्या बाबींवर ते प्रहार करण्यास कचरत नाहीत. बुद्ध विचारासंबंधीचा त्यांचा  व्यासंग त्यांनी दिलेल्या विविध संदर्भावरून सहज लक्षात येतो. वर्तमानात बुद्ध विचार समजून घेतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत कबीर, महात्मा जोतीराव फुले, गाडगे महाराज  यांच्या विचारांची मांडणीही ते चपखलपणे करतात. व्यक्तिगत अनुभव, मुल्ला नसरुद्दीनचे किस्से, ओशो यांचेही उल्लेख त्यांच्या लेखनात येतात. पण ते केवळ विश्लेषणापुरतेच.
 एकूण काय तर प्रज्ञेची भूमी असणाऱ्या प्रतित्यसमुत्पादाचे नेटके भान देणारे मधुकर पाईकराव लिखित “बुद्धाचा प्रतित्यसमुत्पाद” पुस्तक बौद्ध साहित्यात मोलाची भर टाकणारे आहे. हे पुस्तक अभ्यासकांना निश्चितच प्रेरक ठरेल, असा विश्वास वाटतो.

डॉ. राजेंद्र गोणारकर
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड


Comments

Popular posts from this blog

Anna Bhau Sathe /अण्णा भाऊ साठे : वेदना आणि संघर्षाचे भाष्यकार

Dr. Gangadhar Pantawane

दलित, विद्रोही कविताच खरी भारतीय कविता! Loknath Yashwant