jyotirao Phule by Rajendra Gonarkar

. जोतीराव फुले


एकोणीसावं शतक हे भारतात नव्या मूल्यांची पेरणी करणारं शतक होतं . ब्रिटीशांनी सुरू केलेल्या शिक्षणामुळं नव शिक्षित तरुणांना  आपल्या भोवतीच्या सामाजिक विसंगती आणि धार्मिक अवडंबराचं स्तोम नकोसं वाटत होतं. समाजातील कालबाह्य रूढी परंपरा यांना दूर सारून आधुनिक मूल्यांवर आधारित नवा समाज निर्माण व्हावा, अशी मनोभूमिका तरुणांमध्ये निर्माण झाली होती. यातूनच सुधारणावादी चळवळीचा जन्म झाला. या सुधारणावादी चळवळीचे राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, महादेव गोविंद रानडे, गोपाल गणेश आगरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, लोकहितवादी आदि दिग्गज हिरीरीने नेतृत्व करीत होते. याच कालखंडात महात्मा जोतीराव फुल्यांनी प्रागतिक विचारांचा वसा घेऊन समाज परिवर्तनाचे अद्वितीय कार्य केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची त्यांना कणखर साथ मिळाली.
     . जोतीराव फुले हे शेतकरी , कामगार , दलित आणि स्त्रिया यांचे कृतीशील कैवारी होते. रयतेचे ते क्रांतिकारी तत्वज्ञ होते. शूद्रातिशूद्राना आणि स्त्रियांना ज्ञानाचे दरवाजे खुले करणारी चळवळ त्यांनी सुरू केली. भारतातील शूद्र ,अतिशूद्र आणि स्त्रियांच्या शिक्षणाचं ज्ञानपीठ म्हणजे म. जोतीराव फुले होते. . जोतीराव फुले यांनी धर्म , संस्कृती आणि इतिहास यांचे टीकात्मक आकलन केले . चार्तूवर्ण्ये, अस्पृश्यता , जन्मजात वर्चस्व आणि गुलामगिरी अशी जीवनरचना या  विरुद्ध प्रखर हल्ला केला. स्त्रियांना दिली जाणारी पशुतूल्ये वागणूक या विरुद्ध त्यांनी क्रांतिकारी आंदोलन सुरू केले. त्यांच्या विचारांत नवी मानवतावादी ध्येये होती . माणूस हा माणसांचा मापदंड आहे . त्याचं मूल्ये ही माणूसच असला पाहिजे हा त्यांचा विचार होता . बहुजन समाजाला दैन्य दारिद्रय व  हलाखीच्या  स्थितीतून बाहेर पडण्याचे उपाय या संबंधी त्यांचा विचार शास्त्रीय होता. सामान्य माणसाविषयी अपार तळमळ जे जोतीराव फुल्यांच्या विचारांचं मुख्य सूत्र होतं. जोतीराव फुल्यांचा विचार सर्वमानवव्यापी होता. मानवजातीतील सर्व वास्तव विचार आणि सर्वांना समान न्याय हा त्यांचा सत्यधर्म होता. गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म , इशारा , छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा, सत्यशोधक समाजोक्त पूजाविधी , ब्राह्मणाचे कसब, शेतकर्याचा आसूड , सत्सार , हंटर शिक्षण आयोगासमोर सादर केलेले निवेदन, अखंडादी काव्यरचना इत्यादी ग्रंथांची निर्मिती करून भारतातील परंपरागत समाज संस्थाच्या विरुद्ध बंड पुकारणारे जोतीराव फुले हे पहिले भारतीय होते.
महात्मा जोतीराव फुले यांनी आपल्या व्यक्तित्वाला स्वयंप्रेरणेनं  आणि आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी घडवलं होतं. त्यांचा पिंड हा क्रांतिकारकाचा होताआपल्या कार्यसिद्धी साठी  विविध विषयांवरील उत्तमोत्तम पुस्तकांचा त्यांनी काळजीपूर्वक अभ्यास केला होता. त्यांच्या विचारांना परिपक्वता येण्यास त्याचा निश्तितच उपयोग झाला . परंतु ग्रंथ पांडित्यावर ते अवलंबून नव्हते. उलट सामाजिक जीवनातील भल्याबुऱ्या प्रवृत्तींचा अन्वयार्थ लावण्याच्या बाबतीत ते बहुतांशी स्वतःच्या प्रत्यक्ष अनुभवावरच विसंबून राहत. . फुल्यांचा स्वभाव हा चिंतनशील होता. प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याची उकल करण्याची त्यांची वृत्ती होती. त्यांचं व्यक्तित्व प्रयोगप्रवण व विकसनशील होतं. म्हणून एखाद्या विशिष्ट संप्रदायाचा पाईक न होता त्यांनी आपला मार्ग आपणच शोधून काढला. मूलगामी समाज परिवर्तंनाशिवाय आपल्या देशातील कष्टकरी जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत हे त्यांना उमगले होतं. आपले विचार कृतीत उतरवताना जोतीरावांनी ऐनवेळी कधी कच खाल्ली नाही. तत्व आणि व्यवहार, संकल्प आणि साधना यांच्या एकात्मतेतच म. फुल्यांचं मोठेपण सामावलेलं आहे. महणून  "समजले आणि वर्तले | तेचि भाग्यपुरूष जाले | "अशा महापुरुषाच्या मालिकेत त्यांची गणना केली पाहिजे.
     अशा या जोतीरावांचा फुल्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. जोती वर्षाचा असेल नसेल तोच त्यांची आई चिमणाबाईचे निधन झाले. पत्नीच्या निधनाचे गोविंदरावांना अनिवार दुःख झाले. परंतु त्यांनी दुसरे लग्न न करता जोतीरावांचे संगोपन करण्यासाठी एक दाई नेमली. तिनं निष्ठेनं जोतिरावांचं संगोपन केलं. वडिलांनी त्यांना वयाच्या सातव्या वर्षी मराठी शाळेत घातलं. पुढील चार वर्षात या शाळेतील त्यांचा अभ्यासक्रम पुरा होतो न होतो तोच त्यांच्या शिक्षणक्रमात अचानक खंड पडला आणि ते आपल्या घरच्या बागेत काम करू लागले. वयाच्या तेराव्या वर्षी पुण्याजवळील धनकवडी गावातील झगडे पाटील यांची मुलगी सावित्री हीच्याशी त्यांचा विवाहा झाला. जोतीरावांच्या शिक्षणात खंड पडला होता तरी त्यांची शिक्षणाची उर्मी कमी झाली नव्हती. मळ्यात काम केल्यावर ते मिणमिणत्या समईजवळ रात्री वाचत बसत असत. त्यांच्या शेजारी राहणार्या दोन विद्वान व्यक्तींच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. त्यापैकी एकाचे नाव होते गफ्फार बेग मुंशी. हे उर्दू आणि पर्शियन भाषांचे शिक्षक होते. तर दुसरे होते लिजीट साहेब , हे ख्रिस्ती धर्मोपदेशक होते. त्या दोघांनी जोतीला शिक्षण देण्याची कशी आवश्यकता आहे, हे गोविंदरावांच्या मनावर ठसविले. आपली चूक गोविंदरावांना उमगली. त्यांनी परत 1841 मध्ये एका स्कॉटिश मिशनच्या इंग्रजी शाळेत जोतीरावांना टाकले. जोतीराव शाळेत खूप मन लाऊन अभ्यास करीत. परीक्षेत त्यांना प्रथम श्रेणीचे गुण मिळत असत. जोतीरावांनी 1847 साली आपला इंग्रजी शाळेतील अभ्यासक्रम पूर्ण केला. शिक्षणानं त्यांचं मन विशाल झालं. मानवी समता , मानवी हक्क आणि स्वातंत्र्य या नव्या वैश्विक मूल्यांनी ते प्रभावित झाले. ब्रिटिशांचे राज्य उलथून पाडण्याचे , आपला देश स्वतंत्र व बलवान करण्याचे ध्येय ते बाळगून होते. पण त्यांच्या जीवन आणि विचारांना जबरदस्त कलाटणी देणारी घटना घडली. त्या घटनेने त्यांचे जीवन आरपार बदलून गेले.
     झाले असे की, जोतीराव यांच्या एका उच्चजातीय मित्राचं लग्न होतं. मित्राने आमंत्रण दिलं म्हणून ते लग्नास गेले. लग्नाची वरात निघाली स्वाभाविकच तेही वरातीत सामील झाले. पण त्या काळी शुद्र जातीच्या /माळ्याच्या मुलानं  उच्च जातीय लोकांच्या बरोबरीनं  चालण रूढीला मान्य नव्हतं. वरातीतील काही जणांना ही बाब खूपच खटकली, त्यांच्यापैकी एक जण जोतीरावांच्या अंगावर खेकसून म्हणाला,”आमच्या सोबत रस्त्यातून चालायला तुला धारिष्ट तरी कसं झालं ? तू आमच्या बरोबरीचा आहेस असं समजतोस की काय ? चल हट मागे अन चालू लाग सर्वांच्या मागून. “ही भयंकर भाषा ऐकून ते अपमानकारक शब्द त्यांच्या जिव्हारी झोंबले . त्या लग्नाच्या वरातीतून  ते रागाने बाहेर पडले. ते घरी आले . घडलेला प्रसंग त्यांनी आपल्या वडिलांना सांगितला. त्यांचा चेहरा संतापानं लाल झाला होता. वडील म्हणाले , " आपण शूद्र  जातीचे , आपण त्यांची बरोबरी कशी करणार ? त्यांनी तुला शिक्षा न करता तेथून हाकलून दिले हेसुद्धा त्यांचे एकपरी उपकारच आहेत . " झाले ते ठीकच झाले असाच जोतीरावांच्या वडिलांचा सूर होता. परंपरेच्या पुढे जाऊ नये हेच त्यांचे सांगणे होते . पण जोतीरावांनी छत्रपती  शिवाजी महाराज , जॉर्ज वॉशिंग्टन , आणि मार्टिन ल्युथर यांच्या जीवनापासून स्फूर्ती घेतली होती. ते मागे सरणारे नव्हते . त्यांच्या मनात विचारांची खळबळ उडाली . ब्रिटीशांची गुलामगिरी ही राजकीय होती. त्याहून भयंकर होती, हजारो वर्षांपासून अस्तित्वात असणारी सामाजिक आणि मानसिक गुलामगिरी . जोतीरावांनी या सामाजिक आणि मानसिक गुलामगिरी विरुद्ध आपले  शस्त्र उगारले. बहुजनांच्या दुःख दारिद्र्याचं मूळ अज्ञानात आहे हे त्यांनी ओळखलं . स्त्रिया व दलित यांना  शिक्षण दिले पाहिजे, असा जोतीरावांनी ठाम निर्धार केलाशिक्षण मिळाले तर त्यांचा स्वाभिमान जागा होईल . ते सामाजिक व मानसिक गुलामगिरी विरुद्ध बंड  करतील असे त्यांना वाटू लागले. दीर्घ विचारानंतर त्यांनी मुलींसाठी शाळा काढण्याचे निश्चित केले

     बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात १८४८ च्या ऑगस्ट महिन्यात भारतातील पहिली मुलींची शाळा जोतीरावांनी सुरु केली. आणि नव्या समाजक्रांतीचे निशाण रोवलं . १७ सप्टेंबर १८५१ रोजी रास्तापेठेत मुलींची दुसरी शाळा काढली . १५ मार्च १८५२ रोजी वेताळपेठेत मुलींची तिसरी शाळा स्थापन केली. त्या शाळेत वाचन , अंकगणित आणि व्याकरणाची मूलतत्त्वे हे विषय ते शिकवीत . जोतीरावांचे सहकारी सखाराम यशवंत परांजपे , सदाशिव गोविंद हाटे तसेच सदाशिव गोवंडे हे त्यांना ती शाळा चालविण्यासाठी आर्थिक मदत करत . मुलींच्या शाळेत स्त्री शिक्षिका हवी होती. म्हणून त्यांनी आपली पत्नी सावितीबाई यांना शिकविले.त्यांना शिक्षिका केलं .   सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका झाल्या . विनावेतन त्या शाळेत मुलींना शिकवू लागल्या . सनातन्यांनी त्या शाळेत जातांना खूप त्रास दिला . त्यांना दुषणे दिली . कधी शेण फेकून मारले . पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत त्यांनी स्त्री शिक्षणाचे कार्य नेटाने चालू ठेवलं .कोणत्याही स्थितीत विद्या प्राप्त केली पाहिजे या विचारांवर जोतीराव फुले ठाम होते .
" विद्ये विना मति गेली ! मति विना निती गेली
निती विना गती गेली ! गती विना वित्त गेले
वित्ता विना शूद्र खचले ! इतके अनर्थ एका अविद्येने केले
      सर्व सामान्य जणांना विद्येची संधी नाही म्हणून त्यांचा विकास होत नाही . बुद्धीचा विकास नाही म्हणून जीवनविषयक नीतीपासून ते दूर आहेत . म्हणून त्यांच्यात प्रगती नाही आणि गतीही नाही . सर्व सामान्य जनांच्या अधोगतीचं कारण एका अविद्येच्या तत्वात  आहे, अशा शब्दात शिक्षणाचं महत्व सांगणारे म. फुले हे अव्वल दर्जाचे शिक्षण तज्ञ होते यांत शंका नाही

              स्त्री शिक्षणाचं कार्य चालू असतांना जोतीरावांच्या मनात आणखी एका प्रश्नानं उचल खाल्ली. पुण्यातील विधवांचं जीवन नरकप्राय बनलं  होतं . पुनर्विवाहाची चाल रूढ असली तरी तिला सामाजिक मान्यता नव्हती . बाल विधवाचं वाटोळ करण्यात त्या त्या घरातील पुरुषमंडळी मागं पुढं पाहत नसतया विधवांसाठी जोतीराव आणि सावित्रीबाईनी स्वतःच्या घरी बालहत्याप्रतिबंधक गृह सुरु केलं. निराधारांना आश्रय देणं , अपंगांना सहाय्य करण , विद्यार्थ्यांना जेऊ घालणं हाच खरोखर नीतिधर्म आहे असं जोतीराव फुल्यांचं सांगणं होतं .
स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे !
कुटुंबा  पोसावे ! आनंदाने !!
नित्य मुलीमुलांना शाळेत घालावे !
अन्नदान द्यावे ! विद्यार्थ्यास !!
सार्वभोम सत्य स्वतः आचरावे !
सुखे वागवावे ! पंगु लोका !!
अशा वर्तनाने सर्वा सुख द्याल !
स्वतः सुखी व्हाल ! जोती म्हणे !!

संपूर्ण क्रांती हा शब्द आज खूपच रूढ आहे . परंतु मानवी मनात सांस्कृतिक पातळीवर मूल्यव्यवस्था बदलल्या शिवाय कोणताही माणूस क्रांतीसाठी सज्ज कसा होणार ? जोतीराव फुल्यांनी माणसाला उभं केलं . माणसाच्या बुद्धीविकासातील अडसर दूर केले ." झाडाच्या प्रत्येक पानाला सूर्यकिरणांचा लाभ मिळतो तर मानवी समाजात अशी दयनीय अवस्था का ? काही उपाशी , काही तुपाशी ! काही उन्हात काही सावलीत ! आणि याला जन्माचा आधार का असावा ? माणसाचं मोल जन्मावरून नाही तर त्याच्या कर्मावरून ठरवावं या विचारांचा त्यांनी आग्रह धरला .

     . जोतीराव फुल्यांनी शेतीच्या प्रश्नाचा देखील मूलगामी अभ्यास केला होता . आपल्या बोचऱ्या , रोखठोक , अगदी हुबेहूब चित्र उभे राहावे अशा भाषेत शेतकऱ्यांचं दैन्य , दारिद्र्य आणि सावकारी - अधिकारी यांच्याकडून होणारी छळवणूक त्यांनी "शेतकऱ्याचा आसूड " मध्ये अतिशय प्रभावीपणे मांडली . शेतकऱ्याला "बळीराजा " शी एकरूप मानून नव्या ग्रामरचनेचा त्यांनी आराखडा तयार केला . शेतकऱ्याच्या जीवनाचा विकास शेती सुधारल्याशिवाय होणार नाही हे  . जोतीराव फुल्यांनी ओळखलं होतं . शेती सुधारण्यासाठी त्यांनी शेतीसंबधीचं अत्याधुनिक ज्ञान शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे , त्याच्याशी संबधित ग्रंथ त्यांना उपलब्ध झाले पाहिजेत , उत्तम बैल त्यांना मिळाले पाहिजेत , जनावरांसाठी जंगलं मोकळी राहिली पाहिजेत , वाहणाऱ्या पाण्याला अडवून पोलिस आणि सैन्यामार्फत बंधारे घातले पाहिजेत , ठिकठिकाणी असणाऱ्या पाण्याचा शोध घेतला पाहिजे , पिकाचं संरक्षण होण्यासाठी पिकांवर पहारे बसविले पाहिजेत इत्यादी अनेकविध उपाय शेती सुधारण्यासाठी म. फुल्यांनी सुचविले ,  

. जोतीराव फुल्यांनी आपल्या विचारात स्त्री पुरुष समतेचा आग्रह धरला. ते म्हणत पशु प्रांण्यात जाती नाहीत तर त्या माणसात असण्याचं कारण नाही. माणसात असल्याच तर दोन जाती एक स्त्री आणि दुसरा पुरुष आणि यात श्रेष्ठ कोण तर स्त्री , कारण स्त्री पुरुषाला जन्म देते . स्त्रियांच्या सन्मानाचा एवढा विचार करणारे म जोतीराव फुले हे आधुनिक भारतातील पाहीत क्रांतिकारक होते.
    आयुष्य भर जोतीराव फुले सनातन व्यवस्थेशी संघर्ष करीत राहिले . त्यांचे भांडण कुठल्या जातीशी किंवा व्यक्तीशी नव्हतं . त्यांचा लढा मानवतेच्या विरुद्ध असणाऱ्या प्रवृत्तीशी होता . मानवी कल्याण हे त्यांच्या समग्र विचार आणि कार्याचं मध्यवर्ती सूत्र होतं. . जोतीराव फुल्यांनी स्त्रिया , शेतकरी आणि दलित यांच्या साठी केवळ कार्य केलं असं नाही तर त्यांना आपल्या न्याय्य हक्काची जाणीव करून दिली . त्यांना ज्ञानाचं बळ दिलं. लढण्यासाठी धैर्य दिलं. आज स्त्रियांची चळवळ , शेतकऱ्यांची चळवळ आणि दलित चळवळ खूप विस्तारली आहे , याचं श्रेय निश्चितच म. फुल्यांना द्यावं लागेल.
   आपल्या अखेरच्या कालखंडात म. जोतीराव फुले ' सार्वजनिक सत्यधर्म " नावाचा ग्रंथ लिहित होते. हे काम चालू असताना त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यांचा उजवा हात , उजवा पाय लुळा झाला . पण हाती घेतलेले काम त्यांनी सोडले नाही. डाव्या हातानं लिहून त्यांनी त्या ग्रंथाचं लेखन पूर्ण केलं. या ग्रंथाचं पहिलं वाक्य असं आहे ,"मानवप्राणी एकंदर सर्व जगात कशानं सुखी होईल ?" आपल्या अंतिम समयी देखील जगातील मानवाच्या सुखाचा विचार म जोतीराव फुले करीत होते. अखेर २८ नोव्हेंबर १८९० रोजी त्याचं निर्वाण झालं. आज इतक्या वर्षांनंतर देखील त्यांचे विचार सामाजिक वाटचालीत मार्गदर्शक ठरत आहेत . जोतीराव फुले आज नाहीत पण त्यांनी दलित , शोषित पिडीत कामकरी शेतकरी कष्टकरी गोरगरीब या सर्वसामान्य माणसांना आधार दिला . दिलासा दिला . चळवळ दिली , विचार दिला , ध्यास दिला , प्राण दिला , आणि त्या माणसाला जीवन दिलं . त्या माणसांच्या देहामध्ये माणूसपण ओतलं . त्या म. जोतीराव फुल्यांचं स्मरण सदैव प्रेरणादायी असंच आहे. . जोतीराव फुल्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम !!!



डॉ. राजेंद्र गोणारकर

Comments

Popular posts from this blog

Anna Bhau Sathe /अण्णा भाऊ साठे : वेदना आणि संघर्षाचे भाष्यकार

Dr. Gangadhar Pantawane

दलित, विद्रोही कविताच खरी भारतीय कविता! Loknath Yashwant