विराण उद्ध्वततेच्या वेदनेची कळ
विराण उद्ध्वततेच्या वेदनेची कळ कवी गजानन मकासरे यांच्या “ विराण उद्ध्वस्तेच्या वेदनेची कळ ” या कविता संग्रहाला प्रस्तावना लिहिताना मला मनस्वी आनंद हो त आहे . गजानन मकासरे हे संवेदशील मनाचे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. माणसावर , माणसाच्या उत्कर्षासाठी चालणार्या चळवळीकर मनस्वी प्रेम करणे हा त्यांचा स्वभाव आहे. सहृदयता माणसाला कवितेकडे ओढून नेते. अभिव्यक्त व्हायला भाग पाडते . “विराण उद्ध्वस्ततेच्या वेदनेची कळ ” हा गजानन मकासरे यांचा पहिला कवितासंग्रह याची साक्ष देतो. कविता ही मोठी अनोखी निर्मिती आहे. कविता लेखनासाठी भोवतालचे एक आकलन हवे. कळालेले मांडण्याची हातोटी हवी. कविता लेखन हा अनुपम असा सर्जनसोहळा ! या कवितासंग्रहाच्या निमित्ताने कवी गजानन मकासरे आपल्या सर्जन सोहळ्यास आरंभ करीत आहेत. त्यांचे मी अगदी मनापासून अभिनंदन करतो. कवितेची काय किंवा कोणत्याही नव निर्मितीची वाट वेदनेच्या गावाहून जाते. वेदनेशिवाय कोणतेही सृजन शक्य नाही. वेदनेने कोलमडून जाण्यात माणूसपण नसते. वेदनेला सहर्ष भिडणे आणि त...