विराण उद्ध्वततेच्या वेदनेची कळ
विराण उद्ध्वततेच्या वेदनेची कळ
कवी गजानन मकासरे यांच्या “विराण उद्ध्वस्तेच्या वेदनेची कळ”या कविता संग्रहाला प्रस्तावना लिहिताना मला मनस्वी आनंद होत आहे. गजानन मकासरे हे संवेदशील मनाचे एक अभ्यासू व्यक्तिमत्व
आहे. माणसावर, माणसाच्या उत्कर्षासाठी
चालणार्या चळवळीकर मनस्वी प्रेम करणे हा त्यांचा स्वभाव आहे. सहृदयता माणसाला
कवितेकडे ओढून नेते. अभिव्यक्त व्हायला भाग पाडते. “विराण
उद्ध्वस्ततेच्या वेदनेची कळ ” हा गजानन मकासरे यांचा पहिला कवितासंग्रह याची साक्ष
देतो. कविता ही मोठी अनोखी निर्मिती आहे. कविता लेखनासाठी भोवतालचे एक आकलन हवे.
कळालेले मांडण्याची हातोटी हवी. कविता लेखन हा अनुपम असा सर्जनसोहळा ! या
कवितासंग्रहाच्या निमित्ताने कवी गजानन
मकासरे आपल्या सर्जन सोहळ्यास आरंभ करीत आहेत. त्यांचे मी अगदी मनापासून अभिनंदन
करतो.
कवितेची काय किंवा कोणत्याही नव निर्मितीची वाट वेदनेच्या गावाहून जाते. वेदनेशिवाय
कोणतेही सृजन शक्य नाही. वेदनेने कोलमडून जाण्यात माणूसपण नसते. वेदनेला सहर्ष
भिडणे आणि त्यातून नवं घडवण्याची उत्कट इच्छा बाळगणे यात माणसाची कसोटी लागते.
गजानन मकासरे हे या कसोटीला उतरलेले दमदार कवी आहेत. त्याला कारण आहेत डॉ.
बाबासाहेब आंबेडकर ! बाबासाहेबांनी जीवनाकडे पाहण्याची स्वतंत्र दृष्टी कवीला दिली
आहे. हजारो वर्ष कष्ट करून ही ज्यांच्या अंगणात सुखाचे किरण उतरले नव्हते त्यांच्या
खोपटात नि अंगणात बाबासाहेबांनी ज्ञानाचा सूर्य नेला. कवि म्हणतो माय माऊलीच्या
अडाणी कष्टाला बाबासाहेबांनी लेखणीची धार दिली. या लेखणीच्या प्रकाशात कवि गजानन
मकासरे यांना कवितेची वाट गवसली आहे. विषम व्यवस्थेने चिंध्या केलेल्या आयुष्याला
या प्रकाशवाटेनेच प्रतिष्ठा प्राप्त झाली याची कृतज्ञ नोंद कवीने केली आहे.
झडली गुलामी
झडली लाचारी
झडली शूद्रता
उभारले विश्व
बाबाच्या कार्यांनं
कवीचा भोवताल
ग्रामीण आहे. या भोवतालात जगण्यासाठी धडपडणार्या माणसांच्या दु:खाशी कवीचं नातं
आहे. जागतिकीकरणानंतर शहरीकरणाला गती आली पण आधीच गर्तेत सापडलेले खेड्यातील जीवन
अधिकच ढासळले. नव्या अर्थवस्थेने खेड्याला बकाल केले. या देशातील शेतकरी कर्जात
जन्मतो,जगतो आणि मरतोही कर्जात पण याचं कुणालाच
सोयरसुतक नसावं याचं आश्चर्य आहे. शेती पिकत नाही, पिकली तर
मालाला रास्त भाव नाही मग हवालदिल झालेला शेतकरी करणार तरी काय ? या होरपळणार्या जीवाचा आकांत मकासरे “होरपळ “ कवितेत संयतपणे मांडतात. मुलाच्या
भूकेचा परिघ आईसाठी पृथ्वीच्या परिघाहून मोठाच असतो. भूकेच्या आकांतात चूरा
झाल्यागत पडलेले पोटचं पोर बोंबलतं भाकरीसाठी तेव्हा पेरणीसाठी राखून ठेवलेल्या
कणसातून दाणे काढून त्याच्या तव्यावर लाहया करणारी मायीची विवशता “जगावं का मरावं”
या कवितेत ताकदीने प्रकटली आहे.
शेतकर्यांचं दु:ख महात्मा फुल्यांना पहिल्यांदा कळलं होतं.
“शेतकर्याचा आसूड” मध्ये त्यांनी शेतकर्यांचे शोषण करणार्या शेटजी भटजीकडे थेट
निर्देश केला होता. ते शोषण करू शकतात त्याला कारण बहुजनांनाचे अज्ञान आहे हे
त्यांनी स्पष्ट केलं होतं. पण शतक उलटूनही त्याकडे गांभीर्याने पाहिल्या गेले
नाही. आज तर शेती पिकतच नाही. त्यातून काही हाती लागलाच तर
उरल्या सुरल्या
मालाला खूप आहेत
लुबाडणारे
पशू पक्ष्यांपासून
उंदरापर्यंत
उंदरापासून हुशार
माणसापर्यंत
लहरी पाऊस, गारपीट, उंदीर या सोबत
शेतकर्याला नाडणारी ही हुशार माणसं म्हणजे नव्या रूपातील शेटजी भटजीच आहेत हे
वेगळे सांगायला नको. शेतकर्यांसाठी विविध
योजनांच्या घोषणा केल्या जातात निधीची तरतूद केली जाते. पण हा सारा पैसा या योजना
कागदावरच राहतात. त्याचा लाभ शेतकर्यांना होत नाही या वर कवी गजानन मकासरे यांनी
केलेले अत्यंत भाष्य मोठं अन्वर्थक आहे.
आकाशात खूप ढग जमतात
पण होत नाही बरसात
त्याचं होत असतं शोषण
शहरातील वस्त्यात
पण या वास्तवकडे पहाण्यासाठी वेळ आहे कुणाकडे ? जो तो धावत सुटला आहे इतरांना तुडवत स्वार्थाच्या
मुक्कामकडे पण त्याला कळत नाही की त्याचे धावणे सर्वनाशाकडे आहे. हिंसेचा शेवट
कधीच सुखावह असत नाही. पण या वेगवान युगात माणसानं काय गमावलंय याची त्याला कल्पना
नाही. ‘अहिंसा’ या कवितेत कवी म्हणतो,
माणसाला हृदय असतं
पण ते केंव्हाच गळून
पडलंय
पैसा आणि अधिकारासाठी
काळया काळ्या
वावरात’, ‘झडीच्या दिवसात’, ‘मळा’ या कवितेतून शेती आणि
सामान्य माणूस यांचं नातं अधोरेखित झालं आहे . या कवितेतील जाणिवांना करुणेचा
ओलावा लाभला आहे.
गजानन मकासरे
यांची कविता ही खेड्यातील माणसांची कविता आहे. त्यांच्या वेदनेची कविता आहे.
माणसांच्या दु:खाने व्यथित व उदास होणारी कविता आहे पण ती निराशेची खचितच नाही. फुले
आंबेडकर विचारधारेने त्या कवितेला संघर्षाचा स्वर दिला आहे. आंबेडकरवादी कवितांतून
व्यक्त झालेल्या जाणिवांचा व भावविश्वाचा विस्तार करणारी ही कविता आहे. प्रतिमांचा
वा अलंकरनाचा तिला सोस नाही. त्यातील भावाशया इतकीच ती साधी आणि सुबोध आहे. कवी गजानन मकासरे यांच्या “विराण उद्ध्वस्तेच्या वेदनेची कळ” या
कवितासंग्रहाने आंबेडकरवादी कवितेच्या प्रांतात दमदार प्रवेश केला आहे. या पुढील
काळात त्यांची कविता अधिक चिंतनशील होत जाईल यात शंका नाही. कवी गजानन मकासरे यांच्या पुढील काव्यप्रवासास मी
मनापासून सदिच्छा देतो. धन्यवाद !
डॉ.
राजेंद्र गोणारकर
माध्यमशास्त्र
संकुल
स्वामी
रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,
नांदेड
– ४३१६०६
मो.
9890619294
Comments
Post a Comment