“ सर्वंकष राष्ट्रभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर “
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सम्यक संविधानाची निर्मिती करून समताधिष्ठित समुन्नत, समृद्ध समाजाचे स्वप्न पाहिले. ते साकार करण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन
आंदोलन उभारले. पण त्यांच्या पश्चात पाहता पाहता आंबेडकरी चळवळ आत्ममग्न झाली. जे सुखाचे
चार क्षण आपल्या वाट्याला आले तेच जणू चळवळीचं फलित आहे, ही
अल्पसंतुष्ट घातकी मनोवृत्ती वाढीस लागली. जाती अंताच्या निर्धाराची जागा स्वजातीला
कवटाळण्यात झाली. मग एक भेदक प्रश्न उभा राहिला बाबासाहेबांना अभिप्रेत प्रजासत्ताक
व प्रबुद्ध समाज निर्मितीचे काय झाले ? चळवळीचे ध्येय आणि
विचार कितीही थोर असले तरी नेते आणि कार्यकर्ते यांचे समकालाचे भान सुटले की चळवळ
भरकटते. ती पोटार्थी होते. अशावेळी डॉ. सिद्धोधन यांच्या सारख्या बुद्धिजिवींची भूमिका निर्णायक ठरते.
डॉ.
सिद्धोधन हे महाराष्ट्रातील तरुण अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. साहित्य, समाज, संस्कृती आणि राजकारण यात गेल्या पंचवीस
वर्षापासून ते सक्रिय आहेत. ते कोरडे व्यासंगी नाहीत तर त्यांच्या वाणी आणि
लेखणीला स्वानुभवाचे पक्के अधिष्ठान लाभले
आहे. “ सर्वंकष राष्ट्रभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर “ हे त्यांचे पुस्तक त्यांच्या
चिंतनशील मनाचे उत्कट प्रकटीकरण आहे. लेखातील भाषा अत्यंत प्रवाही व वाचकांशी
संवाद साधणारी आहे. पुस्तक वाचतांना प्रत्येक वाक्यामागे त्यांची अस्वस्थता आणि तळमळ
जाणवत राहते. त्यामुळे हे सबंध लेखन मनाचा ठाव घेते. समकालीन आंबेडकरी चळवळीचे
विश्लेषण आणि तिची भावी दिशा जाणून घेण्याच्या दृष्टीने डॉ. सिद्धोधन यांच्या “
सर्वंकष राष्ट्रभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर “ या पुस्तकाचे मोल अनन्य आहे.
-डॉ. राजेंद्र गोणारकर
Comments
Post a Comment