Raja Dhale
राजा
ढाले – सच्चा समतावादी
-डॉ.
राजेंद्र गोणारकर
दलित पॅन्थर या संघटनेचे एक संस्थापक,
प्रख्यात फुले आंबेडकरवादी विचारवंत तथा बंडखोर साहित्यिक राजा ढाले यांना दि.
11 एप्रिल 2015 रोजी औरंगाबाद येथे
मिलिंद कला महाविद्यालयाच्या वतीने ”मिलिंद समता पुरस्कार ” देऊन सन्मानित केले
जात आहे.या निमित्त हा लेख.
|
--------------------------------------------------------------------------------------------

चित्रकार, कवी, समीक्षक, संशोधक, नियतकालिक, लघूनियतकालिकाचे संपादक अशा सार्याच भूमिका वठवितांना त्या त्या क्षेत्रात
राजा ढाले यांनी स्वतःची खास “ढाले” मुद्रा उमटविली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आंबेडकरोत्तर
काळातील दलित पॅन्थर या लढाऊ संघटनेच्या स्थापनेतील ते एक अग्रणी आहेत. राजा ढाले
हे ठरीव किंवा साचेबद्ध नाहीत तर रूढ साचे मोडून मुक्ततेची आस बाळगणारे तीव्रोत्कट
मन त्यांना लाभले आहे. म्हणूनच वयाची पंच्याहत्तरी ओलांडतांना ही नवे संकल्प करणे
आणि त्यासाठी सतत कार्यमग्न राहणे याला तीळ मात्र विराम मिळालेला नाही.
विलक्षण स्मरणशक्ती, सुंदर हस्ताक्षर, प्रचंड व्यासंग, अत्यंत आग्रही भूमिका, टोकदार युक्तिवाद यामुळे
कुणावरही चटकन प्रभाव पाडणारे राजा ढाले माणूस म्हणून अत्यंत स्वागतशील आहेत, मला डॉक्टरांनी खूप बोलू नका असा सल्ला दिला आहे,
असे सांगत तासन तास अखंड बोलणारे, आस्थेनं प्रत्येकाची
विचारपूस करणारे राजा ढाले खूपच करुणामयी आणि लोभस आहेत. त्यांची भाषा शत्रूपक्षावर बरसताना कठोर असते तर बालकवितेत
ती अल्लड, हळवी होते. संशोधन लेखात ती काटेकोर, शास्त्रीय होते तर ललित लेखांत ती अधिकच वेल्हाळ होते. राजा ढाले यांच्या
भाषेची ही सारीच रुपे मोहवून टाकणारी आहेत. काळा स्वातंत्र्य दिन, सत्यकथेची सत्यकथा हे त्यांचे बहुचर्चित स्फोटक लेख त्यातील विचार आशयाच्या दृष्टीने विचार
करता आजही प्रासंगिक वाटावेत इतक्या मोलाचे आहेत. झेन बुद्धिझम तथा बौद्ध धम्मा
संबधीचे त्यांचे चिंतन दिशादर्शक आहे. धम्मलिपीचे संपादन, त्यांनी
वेळोवेळी लिहीलेल्या प्रस्तावना, संशोधनपर लेख, टीका लेख ,
ललित लेख, अनुवाद आदि सामग्री ही समतेच्या लढयाचे वैचारिक शस्त्रागार म्हटली पाहिजे. 1990 साली ज. वि. पवार यांनी राजा ढाले
यांच्या लेख, कविता, अनुवाद यांचे
“अस्तित्वाच्या रेषा ” हे पुस्तक नेटकेपणाने संपादित केले आहे. पण त्या नंतरचे
पुष्कळसे लेखन विखुरलेले आहे. त्या सगळ्यांचे संपादन होणे खूपच गरजेचे वाटते.
निर्विकल्प समतेचा ध्यास
हे राजा ढालेंच्या सदोदित विचार आणि
कृतीचा तेजस्वी आशय आहे. अखेरचा एक जरी माणूस उरला तरी त्यानं समतेसाठी लढलं
पाहिजे ही त्यांची भूमिका चळवळीच्या असीम
बांधिलकीचे लखलखते द्योतकच नव्हे काय ? वेगवेगळ्या
क्षेत्रात नैपुण्य मिळविलेल्या राजा ढाले यांना व्यक्तिगत गुणवत्तेच्या आधारे परंपरावादयात
मानाच स्थान सहज मिळविता आले असते. पण असा स्वार्थी हावरटपणा त्यांना कधी शिवला
नाही म्हणूनच अर्धशतकाच्या कालखंडावर राजा ढाले नावाचं निशाण डौलाने फडकत आहे. नक्षत्रलख्ख चारित्र्य यामुळे
आंबेडकरी चळवळीत त्यांचे स्थान मोलाचे नि मानाचे आहे.
राजा ढाले हे वादळ आहे. हे वादळ एखाद्या
दंतकथेसारखे आहे. फुले आंबेडकर विचारधारा हे नवे संघटन, नवी दिशा हे लघुनियतकालिक यासह राजा ढाले आजही समतेच्या संगरात
योद्धयाच्या भूमिकेत ठामपणे उभे आहेत. ही बाब खूप प्रेरक आहे.
डॉ. राजेंद्र गोणारकर
नांदेड
9890619274
सुंदर
ReplyDelete