Posts

Showing posts from 2015

Anna Bhau Sathe /अण्णा भाऊ साठे : वेदना आणि संघर्षाचे भाष्यकार

Image
  अण्णा भाऊ साठे : वेदना आणि संघर्षाचे  भाष्यकार           समाज व्यवस्थेच्या वरवंट्या खाली शतकानुशतके भरडल्या जाणाऱ्या माणसांच्या वेदनांना अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून उद्गार दिला . पण केवळ दुःखाचा  करूण  विलाप त्यांनी केला नाही तर या दमन आणि शोषणाविरुद्ध आपल्या शब्दांद्वारे संघर्षाचा एल्गार पुकारला. पांढरपेशी मराठी साहित्य जेव्हा कलारंजनात बुडाले होते नि दलित साहित्याचा उगम झालेला नव्हता अशा वेळी अण्णा भाऊ साठे यांनी हा जागर मांडला होता हे लक्षात घेतले तर त्यांच्या ऐतिहासिक कार्याची महती आपसूक कळून येते.              वारणेच्या खोऱ्यातील वाटेगाव (जि. सातारा ) या गावात भाऊराव आणि वालूबाई यांच्या पोटी १ ऑगस्ट १९२० रोजी जन्मलेल्या अण्णा कडे होते तरी काय ? अण्णाचे शाळेतील शिक्षणात मन रमले नाही हे खरे ! जेमतेम दोनच दिवस शाळेत गेलेल्या अण्णाची शिक्षणाची उमेद मात्र परत जागविली त्यांच्या मावस भावाने .  मावसभावाकडे " पांडवप्रताप " , " रामविजय " या सारख्या असंख्य पुस्तकांचे भांडार पाहून अण्णा हरखले. आपल्या निरक्षरतेचे शल्य त्यांना टोचू लागले. भावाकडून त

Dr. Rajendra Gonarkar

Image
                                                                                                                                                                                                                                                           Dr. Rajendra Gonarkar

विराण उद्ध्वततेच्या वेदनेची कळ

      विराण उद्ध्वततेच्या  वेदनेची कळ   कवी गजानन मकासरे यांच्या “ विराण उद्ध्वस्तेच्या वेदनेची कळ ” या कविता संग्रहाला प्रस्तावना लिहिताना मला मनस्वी आनंद हो त आहे . गजानन मकासरे हे संवेदशील मनाचे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. माणसावर , माणसाच्या उत्कर्षासाठी चालणार्‍या चळवळीकर मनस्वी प्रेम करणे हा त्यांचा स्वभाव आहे. सहृदयता माणसाला कवितेकडे ओढून नेते. अभिव्यक्त व्हायला भाग पाडते . “विराण उद्ध्वस्ततेच्या वेदनेची कळ ” हा गजानन मकासरे यांचा पहिला कवितासंग्रह याची साक्ष देतो. कविता ही मोठी अनोखी निर्मिती आहे. कविता लेखनासाठी भोवतालचे एक आकलन हवे. कळालेले मांडण्याची हातोटी हवी. कविता लेखन हा अनुपम असा सर्जनसोहळा ! या कवितासंग्रहाच्या निमित्ताने कवी  गजानन मकासरे आपल्या सर्जन सोहळ्यास आरंभ करीत आहेत. त्यांचे मी अगदी मनापासून अभिनंदन करतो.       कवितेची काय किंवा कोणत्याही नव  निर्मितीची वाट वेदनेच्या गावाहून जाते. वेदनेशिवाय कोणतेही सृजन शक्य नाही. वेदनेने कोलमडून जाण्यात माणूसपण नसते. वेदनेला सहर्ष भिडणे आणि त्यातून नवं घडवण्याची उत्कट इच्छा बाळगणे यात माणसाची कसोटी ल

Raja Dhale

Image
राजा ढाले – सच्चा समतावादी -डॉ. राजेंद्र गोणारकर दलित पॅन्थर या संघटनेचे एक संस्थापक , प्रख्यात फुले आंबेडकरवादी विचारवंत तथा बंडखोर साहित्यिक राजा ढाले यांना दि. 11 एप्रिल  2015 रोजी औरंगाबाद येथे मिलिंद कला महाविद्यालयाच्या वतीने ”मिलिंद समता पुरस्कार ” देऊन सन्मानित केले जात आहे.या निमित्त हा  लेख. --------------------------------------------------------------------------------------------   राजा ढाले हे बहुपेडी व्यक्तिमत्त्व म्हणून सबंध महाराष्ट्राला परिचित आहेत. सामाजिक- सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या बंडखोरीने समाजाला अनेकदा हादरून सोडले आहे. त्यांनी मांडलेल्या भूमिकांनी समाजाला पुनः पुन्हा विचार करायला , विचार बदलायला भाग पाडले आहे. अनेक तथाकथित समाज वैज्ञानिकांना त्यांनी आपल्या लेखणीने ताळ्यावर आणले आहे. त्यांच्या प्रतिभेने स्पर्श केले नाही असे  साहित्य आणि संस्कृतीचे कोणतेही अंग नाही. पण त्यातही करेन ती प्रत्येक गोष्ट परिपूर्ण नि सुंदरच हवी हा त्यांचा आग्रह विलोभनीय म्हटला पाहिजे.  चित्रकार , कवी , समीक्षक , संशोधक , नियतकाल
Image
“ सर्वंकष राष्ट्रभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर “ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सम्यक संविधानाची  निर्मिती करून समताधिष्ठित समुन्नत , समृद्ध समाजाचे स्वप्न पाहिले. ते साकार करण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन आंदोलन उभारले. पण त्यांच्या पश्चात पाहता  पाहता आंबेडकरी चळवळ आत्ममग्न झाली. जे सुखाचे चार क्षण आपल्या वाट्याला आले तेच जणू चळवळीचं फलित आहे , ही अल्पसंतुष्ट घातकी मनोवृत्ती वाढीस लागली. जाती अंताच्या निर्धाराची जागा स्वजातीला कवटाळण्यात झाली. मग एक भेदक प्रश्न उभा राहिला बाबासाहेबांना अभिप्रेत प्रजासत्ताक व प्रबुद्ध समाज निर्मितीचे काय झाले ? चळवळीचे ध्येय आणि विचार कितीही थोर असले तरी नेते आणि कार्यकर्ते यांचे समकालाचे भान सुटले की चळवळ भरकटते. ती पोटार्थी होते. अशावेळी डॉ. सिद्धोधन यांच्या सारख्या बुद्धिजिवींची  भूमिका निर्णायक ठरते.       डॉ. सिद्धोधन हे महाराष्ट्रातील तरुण अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. साहित्य , समाज , संस्कृती आणि राजकारण यात गेल्या पंचवीस वर्षापासून ते सक्रिय आहेत. ते कोरडे व्यासंगी नाहीत तर त्यांच्या वाणी आणि लेखणीला  स्वानुभवाचे पक्के अधिष्ठान लाभले आहे. “ स
Image
भाऊसाहेब मोरे : रानफुल ज्वालांचं मराठवाडी रानाचं आभाळ मुक्त नव्हतं कधीच नव्हतं उगवलं इवलं फूल इथल्या माळावर कधीच भाऊसाहेब तुम्ही रानफुल ज्वालांचं जाळणारं नि स्वतः जळणारं मक्रणपूरला करून बीजभूमी मराठवाड्याच्या मातीला तुम्ही दिला बाबासाहेबांच्या विचारांचा सूर्यस्पर्श तेव्हा पासून कुठं राहिलो आम्ही अस्पृश्य ? ते युद्ध होतं झेप नाकारणार्‍या आभाळाशी ती लढाई होती अंकुर नाकारणार्‍या भुईशी तो लढा होता श्वास नाकारणार्‍या जीवनाशी मक्रणपूरनं दिलं माणूस होण्याचं स्वप्न मराठवाडी माणसांना भाऊसाहेब , तुम्ही दिली आभाळहाक बोलो भीम ! बोलो भीम !! माणसांचा समुद्र गरजला जयभीम... जयभीम !!! निनाद घुमतोच आहे निळ्या नभात तेव्हा पासून तुम्ही दिला नाही फक्त जयभीमचा नारा तुम्ही वाजविला बिगुल क्रांतीचा खास   दिला हिरव्या पृथ्वीला माणूसपणाचा नवा श्वास तुम्ही दिला मुक्तीचा शब्द मुक्या ओठांना तुम्ही दिलं बळ सूर्यफुलांच्या देठांना बाबासाहेबांचा शब्द मानून प्रमाण निजामाचा निजाम उतरविण्याच्या संघर्षात तुम्ही दिलं झोकून स्वतःला पेटलात तुम्ही अन पेटवलं माण