Anna Bhau Sathe /अण्णा भाऊ साठे : वेदना आणि संघर्षाचे भाष्यकार
अण्णा भाऊ साठे : वेदना आणि संघर्षाचे भाष्यकार
समाज
व्यवस्थेच्या वरवंट्या खाली शतकानुशतके भरडल्या जाणाऱ्या माणसांच्या वेदनांना
अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून उद्गार दिला . पण केवळ दुःखाचा करूण
विलाप त्यांनी केला नाही तर या दमन आणि शोषणाविरुद्ध आपल्या शब्दांद्वारे
संघर्षाचा एल्गार पुकारला. पांढरपेशी मराठी साहित्य जेव्हा कलारंजनात बुडाले होते
नि दलित साहित्याचा उगम झालेला नव्हता अशा वेळी अण्णा भाऊ साठे यांनी हा जागर
मांडला होता हे लक्षात घेतले तर त्यांच्या ऐतिहासिक कार्याची महती आपसूक कळून
येते.
वारणेच्या
खोऱ्यातील वाटेगाव (जि. सातारा ) या गावात भाऊराव आणि वालूबाई यांच्या पोटी १
ऑगस्ट १९२० रोजी जन्मलेल्या अण्णा कडे होते तरी काय ? अण्णाचे
शाळेतील शिक्षणात मन रमले नाही हे खरे ! जेमतेम दोनच दिवस शाळेत गेलेल्या अण्णाची
शिक्षणाची उमेद मात्र परत जागविली त्यांच्या मावस भावाने . मावसभावाकडे " पांडवप्रताप ", "रामविजय " या सारख्या असंख्य पुस्तकांचे
भांडार पाहून अण्णा हरखले. आपल्या निरक्षरतेचे शल्य त्यांना टोचू लागले. भावाकडून
त्यांनी अक्षर ज्ञान मिळविले. मग काय अण्णा नी
वाचनाचा चंगच बांधला. रोजची वर्तमानपत्रे , साप्ताहिके
, पुस्तके असे मिळेल ते तन्मयतेने वाचले. पुढे गिरणी
कामगार म्हणून मोरबाग मिलमध्ये नोकरी करू लागले.
पुस्तके आणि माणसे अण्णा वाचतच गेले. तरल, संवेदनशील
, जिद्दी नि हरहुन्नरी अण्णानी
आपल्या भोवतीच्या अंधाराला डोळा भरून पाहिले. वेदना आणि दुःखाचे मनोगत
जाणून घेतले. संघर्षाला सखा करून दुःखितांच्या जिंदगीत चैतन्याचा प्रवाहाला वाट
करून दिली.
अण्णा
भाऊ साठे जीवन धारणा आणि साहित्यविषयक
भूमिका वेगळी नव्हती. वैजयंता कादंबरीच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिले आहे , " जो कलावंत जनतेची कदर करतो, त्याचीच
जनता कदर करते, हे मी प्रथम शिकून नंतर लेखन
करीत असतो. माझा माझ्या देशावर , जनतेवर
नि तिच्या संघर्षावर अढळ विश्वास आहे . हा देश सुखी व्हावा , इथे समता नांदावी , या
महाराष्ट्र भूमीचे नंदनवन व्हावे अशी मला दररोज स्वप्ने पडत असतात . ती मंगल
स्वप्ने पहात मी लिहित असतो . केवळ कल्पतेचे कृत्रिम डोळे लाऊन जीवनातील सत्य दिसत
नसते. ते सत्य हृदयाने मिळवावे लागते . डोळ्याने सर्व दिसते पण ते सर्व
साहित्यिकाला हात देत नाही. उलट दगा देते . माझा असा दावा आहे की, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलितांच्या
तळहातावर तरली आहे. त्या दलितांचे जीवन
तितक्याच प्रामानिक हेतूने नि निष्ठेने मी चित्रित करणार आहे नि करीत आहे.
" माणसाच्या जीवन व्यथा आणि समतेवर आधारित नव्या समाजासाठीची झुंज हे अण्णा
भाऊ साठे यांच्या लेखनातील मूलतत्व यातून प्रकट होते. त्यांचे साहित्य म्हणूनच
विशिष्ट जात वा समूहाचे साहित्य नाही तर ते माणसाचे साहित्य आहे . मानवी जीवनातील
ऋजू भावनेला साथीला घेऊन क्षमाशील वृतीने अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून
माणसाचे अलोट दर्शन घडविले. मानवमुक्तीच्या लढ्याला त्यांच्या या साहित्याने बळ
पुरविले.
अण्णा
भाऊ साठे यांची साहित्य नि जीवन विषयक धारणावर
प्रारंभी कम्युनिस्ट विचारांचा प्रभाव असला तरी तत्वज्ञानाच्या आहारी जाऊन
त्यांनी वाटचाल केले असे कुठेही दिसत नाही. मक्सिम गोर्की , डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य
प्र. के. अत्रे , कॉ. श्रीपाद डांगे , ना. यशवंतराव चव्हाण, उषा
डांगे, शाहीर अमर शेख यांना
त्यांनी आपली पुस्तके अर्पण केली यावरून
कळू शकेल की ते झापडबंद कम्युनिस्ट नव्हते. माणसाला बंधमुक्त करणारा जो कोणता
विचार असेल त्याला अत्यंत खुलेपणाने छातीशी कवटाळण्याचे मनस्वीपण त्यांच्याकडे
होते.
अण्णा
भाऊ साठे यांना अवघे एकोणपन्नास वर्षाचे आयुष्य लाभले. जीवनात त्यांनी पंधराएक
वर्ष लेखन केले . या लेखनकाळात
पस्तीस कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. अडीचशे - तीनशे कथांचे लेखन केले . नाटके
लिहिली. लोकनाट्य उभी केली. स्टालिनग्राडचा पोवाडा, महाराष्ट्राची
परंपरा, माझी मैना सारख्या लावण्या
पोवाडे लिहून मराठी मनाला मोहवून टाकले. त्यांच्या अनेक साहित्यकृतींचे जगातील
कित्येक भाषांत अनुवाद झाले.
संयुक्त
महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णा भाऊ साठे , शाहीर
अमर शेख आणि शाहीर द. ना. गवाणकर ही त्रयी लखलखती रत्ने होती. ही त्रयी म्हणजे
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील "तळपता त्रिशूळ "होता असे वर्णन कॉ. रोझा
देशपांडे यांनी केले आहे.
आज
अण्णा भाऊ साठे यांचा गौरव होतो आहे. पण जे समतेचे स्वप्न ते पाहत होते ते
स्वप्न दिवसेंदिवस दूर दूर जात आहे. अण्णा भाऊचे स्मरण करताना त्या समतेच्या
लढ्याशी बांधिलकीची जाणीव आम्ही बाळगणार की नाही ? की
माणूसद्रोह्यांच्या समूहात सामील होणार, हाच
खरा अंतर्मुख करणारा प्रश्न आहे.
डॉ.
राजेंद्र गोणारकर
मो. ९८९०६१९२७४
Comments
Post a Comment