दलित, विद्रोही कविताच खरी भारतीय कविता! Loknath Yashwant
(डावीकडून राजेंद्र गोणारकर , ऋषिकेश कांबळे , कवी लोकनाथ यशवंत व संजय घरडे)
दलित, विद्रोही कविताच खरी भारतीय कविता!
- लोकनाथ यशवंत
वाशिम: पूर्वीच्या कविता हिंदुस्थानी होत्या. त्यामध्ये चंद्र, तारे, नदी, फुले, वारे यांच्या भावना व संवेदना उमटत होत्या; मात्र त्या कवितांमध्ये माणसांच्या संवेदनाचे प्रतिबिंब कुठेच दिसत नव्हते; परंतु दलित व विद्रोही कवितेने माणसाच्या जाणिवा आणि संवेदनाचे प्रतिबिंब साहित्यात उमटवले. म्हणूनच तीच खरी भारतीय कविता आहे, असे मत प्रसिद्ध कवी व साहित्यिक लोकनाथ यशवंत यांनी येथे व्यक्त केले.
३३ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या दुसर्या दिवशीच्या दुपारच्या सत्रात कवी लोकनाथ यशवंत यांची प्रकट मुलाखत डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. संजय घरडे आणि ऋषिकेश कांबळे यांनी घेतली. यावेळी लोकनाथ यशवंत यांनी सडेतोड उत्तरे दिली. बदलत्या काळात कवितेकडे कसे पाहता? या प्रश्नावर बदलत्या काळात कविताही बदलत आहे; परंतु आता सर्व जगात धर्म प्रभावी ठरत आहे. खरे तर धर्मातूनच आजचा दहशतवाद जन्माला आला आहे. मी तर म्हणतो माणसाला कोणत्याही धर्माची गरजच नाही. त्यांनी चार-पाच तत्त्व पाळावे, दारू पिऊ नये, हत्या करू नये, खोटे बोलू नये, व्यभिचार करू नये, चोरी करू नये हे तत्त्व जर माणसाने पाळले तर तो चांगले जीवन शांतपणे जगू शकतो. त्यासाठी धर्माची गरज नाही, असे मत यशवंत यांनी व्यक्त केले. ऋषिकेश कांबळे यांनी कवितेविषयी विचारल्यावर कवी लोकनाथ यशवंत म्हणाले की माझी कविता म्हणजे सिनेमा आहे. सिनेमामध्ये कसे अनेक दृष्य डोळ्यापुढून जातात व त्याचा अर्थ आपणास एकत्रितरीत्या समजतो तसे माझ्या कवितेचे आहे. माझ्या डोक्यात आणि रक्तात फक्त कविता आहे. मला समाजामध्ये ज्या-ज्या वेळी विसंगती दिसते तेव्हा मला कविता सुचते. कारण मी माझ्या कलावंतातील लहान मुलाला जिवंत ठेवले आहे. जोपर्यंत हे लहान मूल माझ्यामध्ये जिवंत आहे. तोपर्यंतच माझ्या कविता निर्माण होऊ शकतील. त्यामुळे मी माझ्यातील लहान मुलाला सतत जिवंत ठेवतो, असेही लोकनाथ यशवंत म्हणाले. आपण आडनाव का लिहीत नाही, आडनावातून जात डोकावू नये असे वाटते का? या प्रश्नावर लोकनाथ म्हणाले की, माझे नाव लोकनाथ यशवंत रायचुरे असे लांबलचक आहे. म्हणून ते मी लहान केले. तिकडे नाव लहान लिहिण्याची पद्धत आहे. राहिला प्रश्न आडनावातून डोकावणार्या जातीचा, तर भारतीय समाजाच्या, माणसाच्या डोक्यात, मनात, कागदपत्रात तसेच रक्तातही जात असते, असे मत लोकनाथ यशवंत यांनी मुलाखतीदरम्यान मांडले.
Comments
Post a Comment