Dr. Gangadhar Pantawane
तरुणाईचे प्रबळ
पाठीराखे डॉ.गंगाधर पानतावणे
- डॉ. राजेंद्र गोणारकर
डॉ. गंगाधर
पानतावणे यांचे आंबेडकरी साहित्य संस्कृती विश्वातील कार्य अजोड असेच
आहे. तब्बल पन्नास वर्ष “अस्मितादर्श” या वाङमयीन नियतकालिकाच्या
माध्यमातून आंबेडकरी साहित्याला आधार, बळ व अखंड ऊर्जा
देणारे त्यांचे योगदान थोर
आहे. डॉ. गंगाधर पानतावणे सरांच्या व्यक्तिमत्त्वाला असंख्य पैलू
होते. ते व्यासंगी समीक्षक होते, बुद्धिवादी विचारवंत
होते, सव्यसाची संपादक
होते, स्वतः सृजनशील लेखक होते. मराठीचे विद्वान प्राध्यापक होते. पण आमच्यासाठी ते
आमचे सर होते, मार्गदर्शक होते.
मला आठवतं मी जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठ एम. ए.(समाजशास्त्र
) ला
प्रवेश घेतला त्यावेळेस (1994) पानतावणे सर मराठी
विभागामध्ये प्रोफेसर होते. त्यांची धीरगंभीर मुद्रा, बहुतेक वेळा अंगावर असणारा खास सफारी,
गडद आवाज, सहज बोलण्यातही जाणवणारं
त्यांच्या भाषेचं सौष्ठव. हे आम्हाला खूप प्रभावित करी. असे असले
तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दडपण कधी वाटले नाही
कारण त्यांच्या वागण्यात एक सहजता होती. आपलेपणा
होता. अनिवार अशी ओढ होती. सर महात्मा फुले प्रतिष्ठानचे संचालक म्हणूनही काम
पाहत असत. प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाच्या
निमित्ताने त्यांच्याशी संपर्क येऊ लागला. त्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत नेटके असे. फारसा फापट-पसारा औपचारिकता त्यांना मान्य नसे. मला ते सूत्रसंचालन करायला सांगत. ते
करण्यासाठी खास सूचनाही असत. नियोजनात राजानंद सुरडकर, अशोक नारनवरे हे देखील असत. म. फुले यांच्या विचार आणि कार्य या संबंधाने एका
पुस्तकाचे संपादन ही प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले. राजानंद
सुरडकर यांच्याकडून सरांनी मुद्दाम मुखपृष्ठ काढून घेतले. विद्यार्थ्यांना
फुलण्यासाठी अवकाश निर्माण करणे त्यांना प्रोत्साहित करणे, पण हे करताना मी तुमच्यासाठी काही विशेष करतो आहे याचा त्यात
कधीही लवलेश नसे.
नव्वद च्या दशकात विद्यापीठात डॉ. बाबासाहेब
आंबेडकर पदव्युत्तर व संशोधन विद्यार्थी संघटनेचा खूप दबदबा होता. बुद्धप्रिय
कबीर या संघटनेचा लढाऊ अध्यक्ष होता. मी द्वितीय वर्षाला असतांना या संघटनेचा उपाध्यक्ष
झालो. देवेंद्र इंगळे सचिव झाला. यावेळी जेव्हा जेव्हा आम्हाला काही प्रश्नाबाबत
चर्चा करायची असे तेंव्हा आमचं हक्काचं ठिकाण होतं पानतावणे सरांचे
निवासस्थान “श्रावस्ती”. सर अनेक संदर्भ देत प्रश्नांची उकल करीत. आम्ही काय
भूमिका घ्यावी हे सांगत. दरवेळी आम्हाला त्याची भूमिका मान्य होई असे नाही. पण आम्ही
वेगळी भूमिका घेतली म्हणून ते कधी आमच्यावर रागावले नाही. त्यावेळी निखिल वागळे यांच्या महानगरची औरंगाबाद आवृत्ती प्रकाशित होत असे. या
दैनिकात अरुण शौरीचे एक सदर होते. त्या सदरात त्याने बाबासाहेब आंबेडकर यांच्या
संदर्भाने आक्षेपार्ह विधाने केली होती. तो पेपर घेऊन आम्ही सरांकडे गेलो. ते वाचून
सर भयंकर संतापले. अरुण शौरी कसा सोयीचे संदर्भ वापरुन चलाखी करतो आहे. ते त्यांनी सप्रमाण स्पष्ट करून सांगितले. ते म्हणाले ‘असा बुद्धिभेद करणार्या शौरीच्या तोंडाला काळे फासले पाहिजे.’ आम्ही
बाहेर आलो. शौरीचा पुतळा बनविला. विद्यापीठाच्या
गेट समोर अरुण शौरीला शिव्या घालत तो पुतळा नि तो महानगरचा अंक आम्ही जाळला. दुसर्या दिवशी बातम्या झळकल्या. महानगरने आमच्या या
कृतीच्या विरोधात अग्रलेख
लिहिला. नंतर याच अरुण शौरीचे ते पुस्तक ‘वर्शिपिंग ऑफ फॉल्स गॉड’ हे पुस्तक आले. ज्यामुळे देशभर खळबळ माजली. बाबासाहेबांची
बदनामी करण्याचा डाव तर फसला पण अरुण शौरीची विश्वासार्हता मात्र संपली ती संपली.
आम्हाला वाटे विद्यार्थी संघटना विद्यापीठापुरती असू नये तिचा विस्तार व्हावा. म्हणून
लातूर येथे संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या एका भव्य मेळाव्याचे आयोजन केले. युवराज धसवाडीकर
म्हणजे सळसळता उत्साह. त्याने ही जबाबदारी स्वीकारली. या
मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केले ते म्हणजे पानतावणे सर आणि
आंबेडकर कॉलेज चे प्राचार्य डॉ. आर. के. क्षीरसागर यांना. मेळावा
जोरात झाला. तिथेच आमची भेट हर्षवर्धन कोल्हापुरेशी झाली. सर भरभरून
बोलले. क्षीरसागर सरांनी अभ्यासपूर्ण भाषण केले. कार्यक्रम
संपून औरंगाबाद कडे आम्ही रात्रीच कारने निघालो. निघालो प्रवासात सरांनी आम्हाला त्यांचे महाविद्यालयीन जीवन, प्राध्यापकीच्या सुरवातीच्या काळात वर्गात घडलेल्या गमतीजमती असे खूप काही
सांगितलं. हे सांगणं अगदी निखळ होतं. हे
सांगताना त्यांना आणि आम्हालाही हसू आवरत नव्हतं. पहाटे
कधीतरी आम्ही त्याच्या घरी पोहोचलो.गाडीच्या ड्डीक्कीतून सरांची मी ब्रीफकेस काढली. सरांनी ती
ताबडतोब माझ्या हातातून काढून घेतली. मी म्हणालो,” मी घेतो ना सर!“. ते निग्रहाने म्हणाले, “ नाही, अजिबात नाही. माझी बॅग
मीच घेतली पाहिजे.” खरं तर हे त्यांचं सांगणं ही होतं आणि शिकवणं देखील.
पहाटे ते विद्यापीठात मॉर्निंग वॉक साठी न चुकता येत. एकदा पहाटे सर भेटले. म्हणाले , तुमची कविता या अंकात(अस्मितादर्श) मध्ये घेतली आहे. घरी येऊन अंक घेऊन जा.” मी हो म्हणालो. सकाळी आठ वाजता तयार होऊन. माझ्या कवितेची वही घेऊन त्यांच्या घरी पोहोचलो . सरांनी हसून स्वागत केले. माझी कविता असलेला अंक मला दिला. मी म्हणालो, ’सर,माझ्या कवितांची ही वही आपण सवडीने वाचावी. मला सूचना कराव्यात.’ मी वही त्यांच्या हातात दिली. ते म्हणाले, ‘सवडीने
कशाला आता वाचूयात. कविता हे माझं पहिलं प्रेम आहे. पण थांबा
आधी चहा घेऊ मग वाचू.” कधीही घरी गेलो की सर स्वत:च चहा करीत. सर चहा
घेऊन आले. चहा घेऊन झाला. आणि
त्यांनी एकेक कविता वाचायला सुरुवात केली. एक न एक कविता ते वाचत. थोडं
थांबत, त्यावर काही बोलतं. त्यात
स्तुती असे, सूचना
असतं, काही अर्थबोध होत नसेल तर तेच विचारीत, ”इथं नेमकं
काय म्हणायचं आहे?” पूर्ण
वही वाचून झाली. एवढं मोठ्ठं व्यक्तिमत्त्व पण कुठेच बडेजाव नाही.आढेवेढे नाही. नवखा आहे म्हणून दुर्लक्ष नाही. प्रत्येक गोष्टीत त्यांच्या गांभीर्य असे. मी
म्हणालो यावर अभिप्राय द्या. ते म्हणाले, ” का नाही देईन की, मला कवीची एकदा नस सापडली की लिहिण्यासाठी मला वेळ नाही लागत.” आणि दोन
दिवसात त्यांनी माझ्या कवितेवर अभिप्राय लिहून दिला. कागद
माझ्या हाती दिला मी वाचला. त्यांनी स्मित हास्य करीत विचारले,” कसा वाटला अभिप्राय. जमलाय ना !” यावर मी काय बोलणार !
पानतावणे सरांनी विपुल असं लेखन ही केलं. “विद्रोहाचे पाणी पेटले आहे”, “वादळाचे वंशज” या संशोधनपर ग्रंथातून आंबेडकरी चळवळीतील
कर्तृत्वाचा साक्षेपी वेध त्यांनी घेतला. अत्यंत लालित्यपूर्ण शैलीतील त्यांचे “मूकनायक” हे पुस्तक आजही मनाला भुरळ पाडते. “पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर” हा ग्रंथ पानतावणे सरांच्या संशोधक वृत्तीचा अप्रतिम नमूना आहे. प्रचंड
परिश्रम पूर्वक साकारलेला हा ग्रंथ बाबासाहेबांचे पत्रकारितेतील योगदान समजून घेण्यासाठी आजही मार्गदर्शक ठरावा असाच
आहे. शिवाय पानतावणे सरांची ‘मूल्यवेध’, ‘धम्मचर्चा’, ‘चैत्यलेणी’, ‘स्मृतिशेष’ , ‘परिक्रमा’ आदि पुस्तकासह अनेक संपादने साहित्य संस्कृतीला नवे
परिमाण देणारी आहेत. हे नाकाबूल करता येत नाही.
पानतावणे सर अखेरपर्यंत नव्या पिढीशी संवादी राहिले, हे मला खूपच महत्त्वाचे वाटत आले आहे. युवकांची, नव्याने लिहिणार्यांची त्यांनी सदैव पाठराखण केली. पानतावणे
सर हे खऱ्या अर्थाने तपस्वी होते.
तरुणाईला जपणारा त्यांना प्रेरित करणारा मार्गदर्शक लोपला आहे . त्यांच्या
जाण्याने “श्रावस्ती”चा प्रज्ञावंत हरपला आहे. आदरणीय डॉ. गंगाधर
पानतावणे सरांना भावपूर्ण आदरांजली .
Comments
Post a Comment